स्वकर्तुत्वाने, समाजामध्ये चळवळीतून, सामाजिक कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे सर्व जाती धर्मातील आदर्श युवा नेतृत्व….
वेळापूर ( बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस येथील श्री अर्धनारी नटेश्वर यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद सरतापे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. स्वकर्तुत्वाने, समाजामध्ये चळवळीतून व सामाजिक कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून सर्व जाती धर्मातील आदर्श युवा नेतृत्व असणारे मिलिंद उर्फ पप्पू सरतापे यांना अध्यक्षपदावर संधी मिळालेली आहे.
श्री मिलिंद उर्फ पप्पू सरतापे यांनी प्रतिकूल परिस्थितीत समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. उदरनिर्वाह करण्याकरता दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये प्रामाणिकपणे काम करून स्वतःच्या आर्थिक परिस्थितीशी सामना करीत आपला प्रपंच सुस्थितीत आणलेला आहे. दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे हॉटेल सुरू केले. यामधूनच भारतरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी मंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या सहकार्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. चळवळीमध्ये काम करीत असताना सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केलेले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये विविध पदावर काम करून सध्या आरपीआयचे माळशिरस तालुका अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. प्रतिकूल परिस्थितीतून उदयास आलेले नेतृत्व असल्याने कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची पद्धत चांगली असल्याने माळशिरस तालुक्यात आरपीआय पक्षाची घोडदौड सुरू आहे.
वेळापूर येथे जगाच्या पाठीवर एकाच पिंडीवर शिवपार्वतीची मूर्ती आहे. अशा या श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम व महोत्सव असतात. श्री अर्धनारी नटेश्वर यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. या कालावधीत मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील भाविक उत्सवामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत असतात. अशा या पवित्र व धार्मिक कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावर काम करण्याची चळवळीतील युवकाला संधी मिळालेली असल्याने पप्पू उर्फ मिलिंद सरतापे यांच्या मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng