काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता…
इंदापूर (बारामती झटका)
श्री दत्त देवस्थान शहाजीनगर, ता. इंदापूर येथे दत्त जन्मोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत, काल्याच्या कीर्तनाच्या सांगतेने आणि दत्त जन्माचे पाळणे गाऊन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गुरुचरित्राचे पूजन करून सांगता करण्यात आली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, शाहू शिक्षण संस्थेच्या विश्वस्त कोमलताई साळुंके ढोबळे यांच्याहस्ते मानाची आरती करण्यांत आली.
दत्त देवस्थानच्यावतीने तब्बल सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. यामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, पालखी सोहळा पार पडला. पहाटेच्या प्रहारात शेकडो महिला पुरुष भक्तांनी ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामगजरात नामजप केला. दिवसभर महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी रांगा होत्या. दुपारी श्री दत्त भजनी मंडळाचा भजन संध्या कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर काल्याचे किर्तन दत्त जन्मावर पार पडले. लहान गोपालांनी दहीहंडी फोडली. तदनंतर मानाच्या पादुका देवस्थानचे विश्वस्त नीलकंठ मोहिते व त्यांच्या सुविद्य पत्नी राणी नीलकंठ माहिते यांच्या हस्ते पालखीमध्ये ठेवण्यात आल्या. दत्त देवस्थानच्या आवारात पालखी पादुकांची दिगंबराच्या गजरात प्रदक्षणा झाल्या. प्रदक्षणा करून पालखी मुख्य मंदिरात पालखी सोहळा विसावला. तद्नंतर महाप्रसादाचा आस्वाद भक्तगणांनी घेतला.
या दत्त जन्म सोहळ्याचे आयोजन दत्त देवस्थानचे प्रमुख तानाजीराव गायकवाड, नीलकंठ मोहिते, सोमनाथ मोहिते, औदुंबर खंडागळे, सतिश साठे, तिरुपती साठे, रेडा गावच्या माजी उपसरपंच बायडाबाई बाबर यांनी केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते विरसिंह रणसिंग, इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अलकाताई ताटे, हेमंतराव पाटील, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संतोष लोखंडे, श्रीकांत बोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. ओंकार ताटे, युवा उद्योजक संजय दोशी, हर्षवर्धन खाडे, रुषिकेष ढोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng