शिंदेवाडी ( बारामती झटका )
शिंदेवाडी ता. माळशिरस येथील शुभम पांडुरंग जाधव हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत युपीएससी नागरी सेवा परीक्षेत 445 रॅंकमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील यांनी शुभम जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान केला. यावेळी शुभमचे वडील पांडुरंग जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका उपाध्यक्ष चेतन शिंदे, हनुमंत जाधव, महेश धायगुडे, अमित भोसले, विजय जाधव, प्रतिक जानकर आदी उपस्थित होते.
शुभम पांडुरंग जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केलेले आहे. शुभम यांचे आई-वडील शेतकरी आहेत. आपल्या मुलाला अधिकारी बनवायचे यासाठी शेतामध्ये काबाडकष्ट करीत होते. त्यांच्या कष्टाचे शुभमने चीज करून आई-वडिलांची इच्छा पूर्ण केलेली आहे.

शुभम जाधव यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर या ठिकाणी झालेले आहे. अकरावी व बारावीचे शिक्षण सायन्स मधून हडपसर, पुणे येथे साधना विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर बी.ए. ची पदवी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राप्त केली. शुभमचा युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याकरता प्रयत्न चालू होता. शुभम यापूर्वी चार वेळा या परीक्षेत यशस्वी ठरलेला होता. मात्र, यावेळेस शुभमने उत्तीर्ण होऊन गावासह घराण्याचे नाव उज्वल केले आहे. उत्तीर्ण झालेल्या युवकाचे अभिनंदन व सत्कार करण्याकरता माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील शिंदेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभम व त्यांचे वडील यांचा सन्मान केला. यावेळी जाधव परिवार यांच्यावतीने माजी उपसभापती किशोर भैय्या सुळ पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng