योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा…
सातारा (बारामती झटका)
शेतकरी संघटना किसान मंचाचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद विठ्ठल जाधव, कार्याध्यक्ष शंकरराव गोडसे, प्रदेशाध्यक्ष शंकर आण्णा धोंडगे, विश्वनाथ कांबळे व केसुर्डी गावचे ग्रामस्थ यांच्यावतीने सातारा येथील महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ उपप्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी यांना एमआयडीसी खंडाळा टप्पा क्रमांक 1 मधील ओरिएंटल ईस्ट इंडिया कंपनी यांना महामंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्रास स्थगिती देण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, एमआयडीसी खंडाळा टप्पा क्रमांक 1 मधील ओरिएन्टल ईस्ट इंडिया कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या उत्पादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, धुराचे लोट तसेच केमिकल युक्त सांडपाणी यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण जाणवत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना आणि वन्यप्राण्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणात भयानक आजाराला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते आणि परिसरामध्ये फार्मसी कंपनी व एम एन सी कंपनी असून ओरिएन्टल ईस्ट इंडिया ही एकमेव कंपनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारी जाणवत आहे. तरी या कंपनीला महामंडळाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यास स्थगिती देण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng