निमगाव (बारामती झटका)
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी वीज बील माफ करू, असे आश्वासन दिले होते. सरकार आल्यानंतर मात्र वीज बील वसुलीसाठी कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे, ट्रान्सफार्मर सोडवले जाताहेत. या वसुली सरकारकडून दर दोन तीन महिन्यांनी वीज बिलासाठी तगादा लावला जातोय, हा शेतकऱ्यांसोबत सरकारने केलेला विश्वासघात आहे, अशी टिका भाजपाचे जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, यंदा पावसानं चांगली साथ दिली परंतु, या वसुलीबाज सरकारला ते बघवलं नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली आहे, काही ठिकाणी शेतकरी ऊसाच्या लागणी करताहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असुन पिकांना आता पाण्याची सर्वाधिक गरज आहे, अन्यथा पिक हातून जाईल अशी परिस्थिती आहे. त्यातच शासनाने वीज बील वसुली सुरू केली आहे. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे, ट्रान्सफार्मर सोडवणे जोरात सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पाणी असतानाही विजेअभावी शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतातील उभी पिके जळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुका येताच शेतकर्यांना वीज बिल माफ करू, अशी घोषणा करणार्या पवार, ठाकरे सरकारने शेतकर्यांचे विज कनेक्शन कापण्याचा सपाटा लावला असुन हा शेतकऱ्यांसोबत केलेला विश्वासघात आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी पवार ठाकरे सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सध्या सुरू असलेली सक्तीची वीज बिल वसुली या वसुलीबाज सरकारने त्वरीत थांबवावी अन्यथा, भारतीय जनता पार्टी महावितरण विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng