सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यात गेले आठवडाभर पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे यंदाची सरासरी ओलांडली आहे. संपूर्ण जिल्ह्यात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर येऊन हजारो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाला फटका बसला आहे व हजारो शेतकर्यांची पिके पाण्यात गेली आहेत. पावसामुळे ओढे, नाले, नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे नदी नाल्याच्या शेजारील जमिनीतील माती मोठ्या प्रमाणात वाहुन गेली असल्याने जमिनीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबरोबर अनेक शेतकर्यांची पिके वाहून गेली आहेत. अनेकांच्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे खरीपातील काढणीला आलेले सोयाबिन, उडीद, मुगाचे नुकसान झाले तर काहीची तूर, भूईमूग, सूर्यफूल पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांच्या लाखो हेक्टर शेती पिकाला फटका बसला आहे. जिल्ह्यातील हजारो हेक्टर जिरायत, बागायत क्षेत्रातील अनेक पिकांना याचा फटका बसला आहे. शेतकरी आधीच संकटात असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने कोणताही भेदभाव न करता सर्व नियम अटी शिथिल करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकर्यांना तत्काळ हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवारतसेच मा.आ.नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा. बाळासाहेब थोरात महसूलमंत्री, मा. विजय वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री मा.दत्तामामा भरणे पालकमंत्री, जिल्हा अधिकारी सोलापुर यांना इमेलद्वारे मागणीचे निवेदन पाठवले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng