विठ्ठलच्या आखाड्यात स्वाभिमानीची उडी…
पंढरपूर (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तालुका आढावा बैठक आज स्वाभिमानी मध्यवर्ती कार्यालय पंढरपूर येथे पार पडली. आगामी होवु घातलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखाना ही तालुक्याची आर्थिक नाडी आहे, आज कारखाना बंद असल्याने सभासदांच्या ऊस गाळपाचे देखील मोठे हाल या हंगामामध्ये झाले आहेत. तसेच कारखान्याच्या कामगार वर्गाचे वेतन देखील थकीत असल्याने त्यांचे जगणे मुश्किल बनले आहे. अनेक सभासद व कामगार आपल्या व्यथा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त करीत असुन यावर आजवर स्वाभिमानीकडुन आवाज उठवला आहेच. सोबतच भविष्यात देखील लढाई लढली जाणार आहे.
कारखान्याचे गतवैभव पुन्हा यावे. ही संस्था टिकली पाहिजे, विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होवुन शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न सुटावा, यासाठी भविष्यात गट तटांसोबत जायचे कि स्वबळावर लढवावी, याबाबत चर्चा करून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीस सामोरे जावु ही प्रामाणिक भुमिका स्वाभिमानीची आहे. कारखान्याची दुरावस्था झाल्याने तालुक्यातील सभासद व कामगार प्रचंड अडचणीत सापडले आहेत. यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल असे सुतोवाच यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यांनी यावेळी केले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटना या आखाड्यात हिरीहिरीने भाग घेत येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांपर्यंत जावुन तळागाळातील सभासदांशी संवाद साधून सभासदांची मते जाणुन घेवुन तो अहवाल पक्ष प्रमुख राजु शेट्टी यांना कळवण्याचे ठरले. व या अहवालावर विचार विनिमय करून जो कोणताही निर्णय असेल तो पक्ष प्रमुख राजु शेट्टी हेच घेतील असेही या बैठकीत ठरले.

सदर बैठकीस स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, जिल्हा संपर्कप्रमुख रायाप्पा हळणवर, राज्य कार्यकारिणी सदस्य विष्णुभाऊ बागल, विजय रणदिवे, युवा प्रवक्ते रणजित बागल, जिल्हासंघटक शाहजहान शेख, तालुकाध्यक्ष साहेबराव नागणे, जि. कार्याध्यक्ष सचिन आटकळे, नामदेव कोरके, बाहुबली सावळे, शिवाजी सावंत, दशरथ जवळेकर, कांताभाऊ नाईकनवरे, सचिन ताठे, नवनाथ मोहिते, यशवंत बागल, नामदेव पवार, पार्थ सुरवसे, पांडुरंग मोरे यांचे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng