शेतकऱ्यांचा भोंगा कधी वाजणार..? – रणजित बागल, राज्य प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा आघाडी

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्र दिनादिवशीच दुर्दैवाने महाराष्ट्र विचारधारेने “दीन” बनतो आहे. देशात आणि राज्यातील प्रश्न एका बाजुला आ वासुन बसलेले आहेत. परंतु जातधर्मांच्या भोंग्याच्या नादात अनेक समस्यांचा आवाज कित्येक “डेसिबल” ने वाढलेला आहे. हे राज्यातील कानात शिसं ओतुन बसलेल्या राज्यकर्त्यांना ऐकु येत नाही. किंबहुना ते जाणून बुजून या बाबतीत बहिरे बनलेत असे राहुन राहुन वाटते. देशात आणि राज्याच्या राजकिय परिघात अनेक असंतुष्ट व विघ्नसंतोषी प्रवृत्तींची पैदास वाढतेच आहे. गलिच्छ राजकारणाचे तर जणू पेव फुटले आहे. कुणाला भाऊ मुख्यमंत्री झालेला खटकतोय तर कुणाचा पहाटे पहाटे हिरमोड झालाय.. तर कोणी सत्ता परत मिळाल्यानं बारा महिने चोविस तास ‘घड्याळाच्या काट्या’ प्रमाणे अखंडपणे आपापली घरं भरून घेण्यात व्यस्त आहेत. तर कुणी फक्त ‘हात गरिबोंके साथ’ म्हणुन ही दिल्लीच्या हायकमांडच्या आदेशाशिवाय “ब्र” शब्द काढत नाही. महाराष्ट्राची ही वैचारिक वाताहत पाहवत नाही.

सत्ताधारी आणि विरोधकांनी दोन अडिच वर्षे फक्त “फुटकळ” राजकारणात घालवली. शेतकरी प्रश्नावर एकही मोठा राजकारणी अथवा मोठा पक्ष कुठेही दिसला नाही. ऐन उन्हाळ्यात भारनियमन झालं. पिके करपत होती परंतु, कर्तव्यदक्ष विरोधीपक्ष आणि सत्ताधारी मिटकरी ‘हनुमान चालिसा’ मध्ये व्यस्थ होते. केंद्राने महागाईचे सर्वोच्च टोक गाठले त्यावर बोलण्याऐवजी थिल्लर वक्तव्ये राज्यसरकारच्या नेत्यांनी केली. शेतकरी कष्टकरी हा परिवार मानणारे पक्ष परिवार अडचणीत असताना खुशाल ‘परिवार संवाद’ च्या नावाखाली फिरत होते. हे देखील महाराष्ट्र विसरणार नाही.

मुद्दे गाजतिल पण यात आमचे भोंगे कोणी वाजवणार नाहीत. यांचा भोंगा असेल तर मग आम्ही ही लावु तेही आमच्या बांधावर. पण काय करणार शेतकऱ्यांच्या भोंग्याला यांची वीज साथ देत नाही ती ही इथल्या प्रस्थापितांसारखीच आहे, दलबदलू. राजकारण्यांनी ठरवले आहे की, आम्ही भोंगेचं लावु पण शेतकऱ्यांसाठी अजिबात बोलणार नाही. आता आपण ही ठरवणे गरजेचे आहे. भोंगांचे भडके महाराष्ट्राला परवडणारे नाहीत. भडकलेली माथी ताळ्यावर आणावीच लागतील. कुणी जर महाराष्ट्रात दिल्लीच्या बॅटरीवर दंगलींचा भोंगा वाजवत असेल तर त्यांना ही सांगावे लागेल की, या महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा कडा अभेद्य आहे त्या तट्टांवर धक्के देवु नका.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांनी आणलेल्या पवित्र मंगल कलशावर “विरझण” टाकण्याचे पातक करू नका. भोंगाचं वाजवायचा असेल तर नको मंदिरासमोर, नको मस्जिद समोर, तो दिल्ली आणि मुंबईच्या प्रस्थापितांसमोर वाजवा. कष्टकरी शेतकरी यांचा आवाज तिथपर्यंत जावु द्या. महाराष्ट्राला जातीपातीसाठी बोलणारा नव्हे तर मातीसाठी बोलणारा भोंगा हवा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते येथे ‘करे हॉस्पिटल बाल रुग्णालय’ चा भव्य उद्घाटन सोहळा
Next articleइटली ओपन आंतरराष्ट्रीय पॅरा स्पर्धेसाठी दत्ता वरकड रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here