संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे देहूतून पंढरीकडे प्रस्थान

पुणे (बारामती झटका) लोकमत साभार

कोरोना संकट ओसरताच तब्बल तीन वर्षांनी वैष्णवांचा मेळा तीर्थक्षेत्र देहू नगरीच्या इंद्रायणी तीरी अभूतपूर्व उत्साहात दाखल झाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या 337 पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी देहू येथून पंढरीकडे सोमवारी सायंकाळी प्रस्थान ठेवले. ‘इंद्रायणी तीरी टाळ मृदंग वाजती, वीणा झंकारती, वरुणराजाच्या अभिषेकाने न्हाहुनी, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती’ अशी अनुभूती देहूनगरी आली. चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू…, अशी विठुरायाच्या भेटीची आर्तता वैष्णवांठायी दिसून आली. यंदा पावसाने ओढ दिली असली तरी, आषाढीवारीस येणाऱ्या वैष्णवांचा उत्साह तसूभरही कमी न झाल्याचे दिसून आले.

कोरोना महामारीचे संकट असल्याने गेली दोन वर्ष आषाढीवारीचा सोहळा हा साधेपणाने, निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित साजरा झाला. सरकारने कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आणि आषाढीवारी होणार असल्याने वारकर्‍यांनी उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात वारीची वाट धरली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडेकरी, दिंड्या, फडकरी, वारकरी देहू नगरीत आषाढीवारीसाठी रविवारी सायंकाळी दाखल झाले होते. त्यामुळे हरीभजन आणि भक्तिरसाने इंद्रायणी न्हाहुन निघाली होती. पालखी सोहळा प्रस्थानासाठी सोमवारी भल्या पहाटे वारकर्‍यांनी इंद्रायणी स्नान केले.

वैकुंठगमन मंदिरात महापूजा
प्रस्थान सोहळ्याच्या परंपरेनुसार पहाटे पाचला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व शिळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे व अजीत महाराज मोरे यांच्याहस्ते महापूजा झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधीची व सात वाजता वैकुंठगमन मंदिरात महापूजा संस्थानचे विश्वस्तांच्या हस्ते झाली.

‘अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी…,
सकाळपासूनच मुख्य मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. संपूर्ण मंदिर परिसर सुगंधी फुलांनी सजविण्यात आला होता. मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सकाळी आठला पाथरूडकर दिंडी व गंगा म्हसलेकर या मंडळींनी महाराजांच्या पादुका डोक्यावर घेऊन घोडेकर सराफ यांच्या घरी पादुकांना चकाकी देण्यासाठी नेल्या. तिथेच पाद्यपूजा, अभंग व आरती झाली. त्यानंतर पादुका इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. इनामदार वाड्यात दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते पादुकांची महापूजा झाली. त्यानंतर पालखीचे मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींनी टाळ-मृदंगाचा निनाद करत मुख्य मंदिरातील वीणा मंडपात आणल्या. दर्शनबारीचे नियोजनही नेटके झाले होते. सकाळी दहाला काल्याचे किर्तन रामदास महाराज मोरे यांनी केले. ‘अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी…’ हा अभंग निवडला होता. सूर्यनारायण डोईवर येऊ लागला, तशी मुख्य मंदिरात गर्दी होऊ लागली.

तर तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडला…
ऊन-सावल्यांचा खेळ सुरू झाला, प्रस्थानाची वेळ झाल्याने त्याचप्रमाणे मुख्य मंदिरात दिंड्या जागा घेऊ लागल्या. भगव्या पताका फडकावित वैष्णवांची पावले मंदिराच्या दिशेने पडू लागली‌ प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळेच चैतन्य होते. अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. मंदिर आवारात मानाचे अश्‍व दाखल झाले. देहूकर दिंडीने ज्ञानोबा-तुकाराम या तालावर टाळ-मृदुंग कल्लोळ आणि वीणेचा झंकार करायला सुरुवात केली. दुसरीकडे वीणा मंडपात महापूजा झाली. देहु संस्थानाच्या वतीने मानकऱ्यांचा आणि दिंडेकर्यांचा सन्मान केला. नभांगणी उन-सावल्यांचा, तर तुकोबांच्या अंगणी वैष्णवांनी खेळ मांडल्याचे दिसून आले.

पालखी आजोळघरी इनामदार वाड्यात विसावली
साडे तीनच्या सुमारास ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…’, असा जयघोष करीत देहूतील तरुणांनी पालखी खांद्यावर घेतली. वीणा मंडपातून अपूर्व उत्साहात पालखी बाहेर पडली. त्यावेळी वरुणराजाने सोहळ्यावर हलकासा अभिषेक केला‌. त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आली. टाळ-मृदुंगाचा कल्लोळ टिपेला पोहोचला होता. सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर पालखी आजोळघरी इनामदार वाड्यात विसावली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविंचुर्णी येथील श्री बाळोबा देवस्थान उत्सवास उत्साहात सुरुवात
Next articleविधान परिषदेचे नवनियुक्त आ. श्रीकांतजी भारतीय यांचा सोलापूर जिल्हा प्रभारी के. के. पाटील यांच्या वतीने सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here