भागवत कथेच्या प्रथम दिवसाला आमदार गोवर्धनजी शर्मा यांची सदिच्छा भेट
अकोला (बारामती झटका)
अकोला शहरातील गोरक्षण मागे दत्त कॉलनीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण व श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा प्रथम दिवस पार पडला. कथेच्या पहिल्या दिवशी परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दाखवला. व आमदार गोवर्धन शर्मा यांनी भागवत कथेमध्ये ग्रंथाचे व भागवताचार्य ह.भ.प. श्री गणेश महाराज शेटे यांचे पूजन करून कार्तिक महिन्याच्या महानपर्व काळावर या सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. हिंदू धर्म टिकला पाहिजे, याकरिता अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन होणे अतिशय महत्त्वाचे आहे, असे उद्गार आमदार गोवर्धन शर्मा यांनी काढले
भागवत कथेमध्ये महाराजांनी प्रथम दिवसाचे वाकपुष्प गुंफतांना सांगितले कि, सध्या तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहे आणि मुलाचे आई-वडील हे संपत्ती कमावण्यामध्ये एवढे धुंद झालेले आहेत की त्यांना स्वतःच्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. म्हणून वडीलधाऱ्या मंडळींना नम्र विनंती आहे कि, प्रपंच करण्याकरता संपत्ती महत्त्वाची आहेच पण आपली संस्कृती, आपला धर्म, आपल्या रूढी, परंपरा, आपल्या चालीरिती तरुण मुलांना कळायला पाहिजे, याकरिता वडीलधार्या मंडळींनी स्वतः जातीने लक्ष देऊन आपली मुले कसे सुसंस्कारित होतील, हे पाहणे फार गरजेचे आहे. तसेच यावेळी संस्कार मिळण्याकरिता धार्मिक कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा ही विनंती व्यासपीठाच्या माध्यमातून गणेश महाराज शेटे यांनी केली.
दुपारी ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज नावकार यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये गजानन विजय ग्रंथ पारायणाचा प्रथम दिवस पार पडला, अशी माहिती श्री. गणेश पाटील, लांडे दत्त कॉलनी अकोला यांच्यावतीने देण्यात आली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng