सत्यजित तांबे यांचा मतदारांवर भरवसा

विधान परिषद : भाजपसोबत तूर्तास घरोबा नाही

मुंबई (बारामती झटका)

काँग्रेसचे परंपरागत घराणे म्हणून ओळख असलेल्या थोरात-तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेल्या दोन लाख मतदारांवर भरवसा असल्याचे चित्र आहे. राज्यात राजकीय समीकरणाचे कडबोळे झालेले असताना कोणताही धोका नको म्हणून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.

भाजपच्या पाठिंबासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असले तरी अद्याप याबाबत भाजप अथवा तांबे यांच्याकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. दरम्यान सुमारे २ लाख ५० हजार इतके मतदार असलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात तांबे यांनी दोन लाखांच्या दरम्यान नोंदणी केली आहे.

डॉ. सुधीर तांबे या अगोदर काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीत सलग दोन वेळा विजय झाले होते. यावेळी विविध संघटना, महाविद्यालये, शिक्षक संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे यावेळी देखील हे मतदार पाठीशी राहतील, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

सत्यजित तांबे यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण प्रदेश स्तरावरील प्रमुख नेत्यांनी डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केला. त्यानुसार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र, त्यांनी उमेदवारी दाखल न करता सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. या पक्षशिस्तभंगामुळे तांबे पितापुत्रावर निलंबनाची कारवाई झाली आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही मौन बाळगले असून त्यांच्या भूमिकेवर तांबे यांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा आहे.

नगरमधील समीकरणे बदलणार ?
बाळासाहेब थोरात आणि शिक्षक भारतीचे आ. कपिल पाटील हे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जातात. कपिल पाटील यांनी जाहीर सभा घेत सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिल्याने आघाडीतील पक्षांनी फारकत घेतल्याचे स्पष्ट आहे. तांबे यांची अपक्ष उमेदवारी, थोरात यांचे मौन आणि कपिल पाटील यांचा पाठिंबा याबाबत नगर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरणे अस्तित्वात येत आहेत.

मविआला शेकापचा पाठिंबा
विधान परिषदेच्या कोकण, नागपूर आणि औरंगाबाद येथील शिक्षक मतदार संघातील तसेच अमरावती, नाशिक येथील पदवीधर मतदारसंघातील आघाडीच्या सर्व उमेदवारांना शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. या पाच मतदारसंघात येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. या सर्वांच्या विजयाकरिता शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करावी, असे निर्देश पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दिले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअनैतिक संबंधातून मित्राचा खून केला, मित्रच आजन्म गजाआड जाऊन बसला
Next article“आबांच्या मावळ्यांना भेटायला बारामतीचा वाघ आलाय; दादा तुम्ही विरोधी पक्षनेते असला, तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here