युवक काँग्रेस नेते गणेश ननवरे यांचा काँग्रेसला सल्ला
नाशिक (बारामती झटका)
सध्याचे नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, यांची काँग्रेसने एक प्रकारे प्रतारणाच केली आहे. मोठे संघटनकौशल्य असणाऱ्या सत्यजित तांबे यांची हकालपट्टी काँग्रेस पक्षाला निश्चितच परवडणार नाही, असा सूर सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे मा. उपाध्यक्ष गणेश ननवरे यांनी काढला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकही काढले आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, काँग्रेस पक्षासाठी धोकादायक ठरू पहात आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असताना, त्यांना ताकत द्यायची सोडून काँग्रेस पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. यामुळे पक्षातील बहुतांश युवक वर्ग नाराज झाला आहे. अनेक पदाधिकारी राजीनामा देत आहेत. ही बाब काँग्रेस पक्षासाठी निश्चितच धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तांबे यांच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाची तब्बल १०३ वर्षे सेवा केली आहे. काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण असताना, मध्यंतरीच्या काळात त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा होती. या काळात राज्यातील युवक वर्गाची नाळ काँग्रेसशी जोडण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. कोरोना काळात राज्यात ज्यावेळी रक्ताची निकड भासू लागली, त्यावेळी त्यांनी कौशल्याने अनेक रुग्णांना रक्ताचा पुरवठा आणि बेडची उपलब्धता करून दिली होती. त्यांच्या या कृतीचे मोठे कौतुक काँग्रेस पक्षात झाले असल्याची जाणीव त्यांनी पक्षाला करून दिली आहे.
सन २००० साली युवक काँग्रेसच्या सचिव पदापासून सत्यजित तांबे यांनी कामास सुरुवात केली. गेल्या २३ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदासह, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी भूषवले. त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा काळ काँग्रेस पक्षाला उभारी देणारा ठरला. पक्षाला धक्का देणाऱ्या अनेक घटना आजवर राज्याच्या इतिहासात घडल्या आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला, यावेळेस काँग्रेसची मते फुटली होती. महाविकास आघाडीच्या विश्वासदर्शक ठरावास तब्बल ११ आमदार गैरहजर राहिले. या घटनांची अद्याप चौकशीच सुरू आहे. असे असताना काँग्रेसनिष्ठ नेते सत्यजित तांबे यांच्यावरच तातडीने कारवाई का ? याबाबत युवक काँग्रेसमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसनिष्ठ तांबे कुटुंबाला जाणीवपूर्वक तर टारगेट केले जात नाही ना ? असा सवाल युवक काँग्रेसमधील वर्गातून होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng