आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी राजकीय दबाव
मुंबई (बारामती झटका)
भाजप विरहित महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ झाले. पण अडीच वर्षे लोटली तरीही भाजपला सत्ता स्थापनेचे राजकीय गणित जुळत नसल्याने आता भाजपच्या नेत्यांनी राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना ‘लक्ष’ करण्याची रणनीती असल्याने प्रशासनातील सनदी अधिकारी वर्ग धास्तीत आहे.
महाविकास आघाडी सरकारबरोबर घटनेच्या चौकटीत काम करणारे केंद्रीय सेवेतील अधिकाऱ्यांना लक्ष करण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुरू केले आहे. किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांना बेशरम म्हणत थेट चौकशीची धमकी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर भाजपचे वादग्रस्त कार्यकर्ते मोहित कंभोज यांनी तोंडी आरोप केले आहेत. राज्यातील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांवर सहकार्य करत नसल्याच्या आरोपातून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवत असल्याची चर्चा आहे.
शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांचे कथित रेसोर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या यांनी प्रतीकात्मक हातोडा घेऊन दापोलीकडे मोर्चा काढला. जिल्ह्याच्या पोलीस निरीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर अडवल्याने सोमय्या यांनी संबंधित शिवराळ भाषा वापरत चौकशीची मागणी केली.
मुंबई महापालिकेने भाजपचे वादग्रस्त नेते मोहित कंभोज यांच्यावर कारवाई केल्याने त्यांनी मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चहल यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केल्याची चर्चा आहे. या शिवाय अनेक आयएएस व आयपीएस यांना केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून विकास आघाडी सरकारला सहकार्य करू नका, अशी तंबी दिल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. ‘ईडी’ चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबतची वादग्रस्त प्रकरणे केंद्रीय तपास यंत्रणांनी हाती घेतली असून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या चौकशीची सर्व प्रकरणी न्यायालयाने ‘सीबीआय’ कडे सोपविण्याची आदेश दिला आहे.
चौकशी समितीतही अधिकारी नाही
केंद्रीय सरकारच्या दबावाखाली महाराष्ट्र केडरचे सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने भाजप नेत्यांशी संबंधित एखादी चौकशी समिती स्थापन करायची ठरवली तर त्यासाठी हे केंद्रीय सेवेतील अधिकारी नकार देतात, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
