गरीबीतून वडिलांनी केलेल्या कष्टाला आले यश.
अकलूज (बारामती झटका)
आजकाल समाजात डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर, शिक्षकाचा मुलगा शिक्षक झालेले पाहिले आहे. पण, एका साखर कारखान्यातील को-जनरेशन विभागात कंत्राटी काम करणा-या कामगाराचा मुलगा एमबीबीएस परिक्षेत यश संपादन करून डॉक्टर बनला आहे. वडीलांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत कष्ट करून मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते, ते आज प्रत्येक्षात साकारले आहे. मुलाने वडिलांच्या कष्टाचे चीज करत हे यश संपादन केले आहे.
बाळू सोपान लोखंडे रा. माळेवाडी, अकलूज हे गेली १३ वर्ष शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यात कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहे. आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे व उच्चशिक्षित व्हावे, हेच त्यांचे ध्येय होते. मुलानेही लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न बघीतले होते. पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे वडीलांनी पडेल ते कष्ट करून मुलाचे शिक्षण पुर्ण केले आहे. वेळ प्रसंगी सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी सेवक कल्याण निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली तर मित्र मंडळीनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. बाळू लोखंडे यांच्या पत्नी सौ. अलका लोखंडे यांनी ही महिला बचत गटाच्या माध्यमातून मुलाला शिक्षणासाठी हातभार लावला.

बाळू लोखंडे यांचा मुलगा डॉ. स्वप्नील लोखंडे याचा नुकताच एमबीबीएसचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन हे यश संपादन केले आहे. त्याचे पहिली ते चौथीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा डिसकळ (ता. खटाव, जि. सातारा) येथे झाले असून पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे झाले आहे. बारावीनंतर इस्लामपूर (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च येथे डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. तसेच बाळू लोखंडे यांची मुलगी कु. सायली बाळू लोखंडे हिने बी.एस्सी. डिएमएलटी शिक्षण घेतले असून ती सध्या अकलूज येथील नामांकित पॅथाॅलाजी लॅबमध्ये जाॅब करीत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng