सातारा (बारामती झटका)
सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये रोमहर्षक प्रात्यक्षिक, व्याख्यान व गायन इत्यादी माध्यमातून राष्ट्रीय छात्र सेना दिन संपन्न झाला. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या शुभेच्छानी कार्यकर्माची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सिनियर अंडर ऑफिसर खुशी जांगिड, ज्युनियर अंडर ऑफिसर श्रीकांत शेडगे, प्रवीण रोडे, जानवी सत्रे, सार्जंट प्रियांका चव्हाण, आकांक्षा मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्र सैनिकांनी मार्च पास संचलन, रायफल ड्रिल डेमो सादर करून सैनिकी शिस्तीचे प्रदर्शन केले. त्यानंतर सिनियर अंडर ऑफिसर रोहित शिंदे, खुशी जांगिड, प्राजक्ता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कॅडेट गायत्री भिलारे, प्राजक्ता भोसले, साक्षी जाधव, श्रावणी पवार, कॅडेट राज देशमुख, कुमार कदम, विश्वास चाळके, आदित्य साबळे यांनी दहशतवाद्यांनी पुलवामा येथील सशस्त्र सेनादलावर केलेल्या भ्याड हल्याला भारतीय सैनिकांनी कसे चोख उत्तर दिले याचे रोमांचकारी प्रदर्शन नाट्य सादर करून प्रेक्षकांच्या मनातात राष्ट्रप्रेम आणि सैनिकांच्या प्रती आदराची भावना निर्माण केली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. शिवाजीराव पाटील यांनी छात्रसैनिकानी बुद्ध, महावीर, महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, महात्मा गांधी, व फुले-शाहू-आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला राष्ट्रवाद जोपासावा आणि जात, लिंग यावर आधारित फुटीरतावादी विचारापासून दूर राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, देशात व्यक्तिपूजा वाढता कामा नये. भारताच्या संविधानातील हक्क उपभोगताना आपण भारतीय नागरिकांची कर्तव्ये समजून घ्यायला हवीत. देशात कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही येता कामा नये याची काळजी भारतीय नागरिकांनी सतत काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही धर्मावर आधारित राष्ट्रवाद देशाचे हित करत नाही म्हणून देशाचे संविधान मनापासून वाचून आचरण करावे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. सुभाष वाघमारे यांनी देशप्रेमी या चित्रपटातील ‘मेरे देश प्रेमियो आपस मे प्रेम करो’ हे देशहितपर गीत गाऊन सर्वांना प्रफुल्लीत केले. संविधान मूल्यांवर आधारित ’संविधानाचा प्रकाश तू’ ही कविता सादर केली. त्यांनी छात्रसैनिकांना समाजातील भेदभाव विसरून भारतीय संविधानातील समतेचा प्रकाश होऊन भारताला सुजलाम सुफलाम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रोशनआरा शेख व डॉ. रामराजे माने देशमुख यांनी उपस्थित राहून विद्यार्थांचे कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्जंट अनिकेत ननवरे, लक्ष्मी फडतरे, श्री. दत्ता कोळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे नियोजन, प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन.सी.सी. कंपनी कमांडर लेफ्टनंट प्रा. केशव पवार यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng