सातारा शहर पोलीस स्टेशन येथे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविराज कदम यांची तक्रार दाखल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्याकडे तपास.
सातारा ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्यात बियाण्यांचा तुटवडा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सातारच्या औद्योगिक वसाहतीत कृषी विभागाने छापा टाकून १०२२ क्विंटल सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त केले. या कारवाईत २ कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी बुधराव राकेश दवंडे रा. गंज बेतुल, मध्यप्रदेश आणि कंपनी प्रतिनिधी अमित दिवाण या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तर याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविराज कदम यांनी तक्रार दिली आहे.
कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी औद्योगिक वसाहतीतील अनुप ओमप्रकाश डाळ्या रा. उत्तेकर नगर, सातारा यांच्या खासगी गोदामाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना सोयाबीन बियाणे चाळणी लावून २५ किलोंच्या पिशव्यांचे बॅगिंग आणि टॅगिंग करताना निदर्शनास आले. त्या बॅगेवर उत्पादक व विपननकरिता सुंदरम एंटरप्रायजेस प्रा. लि. मँक्यानिक चौक, माता मंदिरजवळ, गंज बैतुल मध्यप्रदेश असा मजकूर छापलेला होता.
दरम्यान, तेथे २५ किलोच्या १९१६ बॅगामध्ये ४७९ क्विंटल बियाणे आणि गोणपाटाच्या ५० किलोच्या वजनाच्या १०८६ बॅगा आढळून आल्या. यामध्ये ५४३ क्विंटल सोयाबीन होते. अशाप्रकारे एकूण १ हजार २२ क्विंटल सोयाबीनचे बोगस बियाणे आढळून आले. या सोयाबीनची किंमत अंदाजे २ कोटी ४ लाख ४० हजार रुपये आहे. त्याचबरोबर मजकूर छापलेल्या ५२० रिकाम्या बॅगा, ४७० लेबल्स, बॅगच्या २ शिलाई मशिन, एक वजन काटा आणि बियाणे प्रोसेसिंग मशिनही दिसून आले. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर हे करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng