सिंधुताई सपकाळ यांचा जन्म, विवाह, सामाजिक कार्य आणि मिळालेले पुरस्कार यांचा जीवनप्रवास.

माळशिरस (बारामती झटका)

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर इ.स. १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. गाव लहान असल्याने तेथे सुविधांचा अभाव. घरची गुरे राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.

सिंधु ताईंचा विवाह.

विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.

अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्यावेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. माईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.

सिंधु ताईंचा जीवनातील संघर्ष.

दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या माईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या माईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.

त्यावेळेस ताई चे वय होते फक्त 20 वर्ष, शिक्षण फक्त चौथी,
अंगावर एकच पातळ त्यालाही दोन चार गाठी बांधलेल्या,
त्यावेळेसच यांचे जग संपले होते, आयुष्याला पूर्ण विराम दिला होता परंतु त्या एका लेकरा साठी ताई ला जगायचे होते मरायचे न्हवते,

त्यावेळीस त्यांना कोठे जावे समजले नाही म्हणून ताई रेल्वेत भीक मागत,

त्यांनी सांगली रेल्वे स्टेशन वर सुद्धा भीक मागितली,

गाणे म्हणून पोट भरायची, नातलग नसल्यामुळे कोठेच जाऊ शकले नाहीत,

दिवसभर भीक मागायचे आणि रात्री रेल्वे स्टेशन वर घाबरून लपून बसायचे पण अध्यान मध्यान रात्री एखादा भिकारी जोर जोरात रडायचा कि मी आता मरणार आहे, मला कोणी कोणी नाही, मला कोणीतरी 2 घोट पाणी पाजा… त्यावेळेस ताई त्यांच्या जवळ जात आणि त्यांना म्हणत कि फक्त पाणी पिऊन मरू नकोस माझ्याजवळ भाकरी आहे ती खाऊन मर, त्या भाकरी बारीक बारीक करत आणि त्याला खाऊ घालत परंतु ते भिकारी खाल्यावर मरतच नसत, मग ताई त्याची आई होत…

या बोलण्याने त्यांना खायला मिळाले, गाणे गायल्याने खायला मिळाले, ज्याला ताई ने खायला दिले त्याने ताई ला सोडले नाही… म्हणूनच समाज सेवेला सुरुवात झाली यांनी जाणून
बुजून काहीच केले नाही, त्या भिकाऱ्यांची आई झाले, त्यांना भुताची भीती वाटत नसे पण माणसांची फार भीती वाटत असे…

त्यांना वाटायचे कि त्यांना कोणीतरी आसरा द्यावा, शेवटपर्यंत ते रात्र झाली कि स्टेशन वर जात, भिकाऱ्यांना घ्यायच आणि संस्था मध्ये घेऊन जायचे, ते लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांना आपल्या मुलासारखे समजत उलट ते म्हणतात कि असे आयुष्य माझ्या वाट्याला आले नसते तर मी मोठी झाले नसते मी आयुष्याचे आभार मानते.

ते म्हणतात कि थोडेसे संकट आले तरी महिला आपल्या आयुष्याचा शेवट करतात, ताईंचे वय होते 20 वर्ष
,तसेच 10 दिवसांची बाळंतीण, भिक्षा दररोज मिळेल याची खात्री न्हवती, नियती सुद्धा त्यांची कसोटी घेत.
एकदा त्यांना पहिल्या
दिवशी खायला मिळाले नाही, दुसऱ्या दिवशी खायला मिळाले नाही आणि तिसऱ्या दिवशी देखील खायला मिळाले नाही,
ते म्हणतात इतकी भूक लागली होती कि रस्त्यावरील दगड खावेसे वाटत परंतु दगड चावायचे सामर्थ्यच येत न्हवते, मग त्यावेळेस त्यांना वाटायचे कि रामाला दुर्बुद्धी झाली, सीतेला सोडून दिले त्यावेळेस सीतेला वाल्मिकी किती पटकन मिळाले, त्यांना त्या आधुनिक रामाने सोडले होते तेव्हा त्यांचे वाल्मिकी कोठे होते कि कलियुगात वाल्मिकी च नाहीत….
म्हणून लक्ष्यात घ्या रावण गल्लोगल्ली फिरतात, राम गायब झाले कंस भरारी घेत आहेत परंतु कृष्ण दिसतच नाहीत ही त्यांची शोकांतिका आहे.
त्यावेळेस त्या रात्री खूप घाबरायचा….
भूतांना नाही तर लोकांना, त्यावेळेस त्या बाहेर पडायच्या, बाळ घेऊन चालत निघायच्या, असे कित्येक रात्री ते बाहेर पडले कि स्मशानात जाऊन बसायच्या त्यांनी भरपूर रात्री स्मशानात घालवल्या, त्यांना एक शोध लागला.. मेल्याशिवाय माणसे स्मशानात जात नाहीत आणि रात्री भुताच्या भीतीने कोणीच येत नाहीत त्यामुळे स्मशान च त्यांना योग्य वाटे,
एक घटना ते सांगत, एकदा खूप भूक लागली होती त्यावेळेस तेथे एक प्रेत यात्रा चालली होती, गरीबा घरचे प्रेत होते कारण गरीबाच्या प्रेत यात्रेला जास्त माणसे नसतात फक्त 10 ते 20 माणसे असतील, त्यांना असे वाटायचे कि माणूस आयष्यात कधीच वाईट नसतो त्या माणसाची भूक वाईट असते, वाईट करायला भूक लावते, त्यांच्या लक्ष्यात आले कि प्रेत यात्रा चालली आहे म्हणजे ते विसावा देतील आणि विसावा दिल्यावर काहीतरी टाकतील त्यांचे लक्ष्य फक्त ते काहीतरी टाकण्यावरच होते नंतर त्यांच्या लक्ष्यात आले कि त्यांना ते मारतील कारण त्यादिवशी त्यांचे बाळ 16 दिवसांचे होते त्या झाडाखाली बसून राहिले, तेव्हा ओंजळ भर पीठ आणि सव्वा रुपये टाकले, गरीबा घरचे प्रेत होते घरी काही नसेल, त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला कारण त्यांना काहीतरी खायला मिळणार होते, ते सर्व रडत होते, सांत्वन झाले, वारा वाहत होता परंतु त्यांचे लक्ष्य फक्त त्या पिठाकडे होते त्यांना ते पीठ वाऱ्याने उडून जाण्याची भीती वाटत होती, कुत्र्यांनी तिथे येऊन पीठ खाऊ नये असे वाटत, लोकं निघून गेले, पहिले त्यांनी टाकलेले पीठ पदरात घट्ट बांधून घेतले, ते पीठ खाली पडू नये याची काळजी घेतली, सव्वा रुपया घेतला, खूप अंधार पडला होता, स्मशानात गेले प्रेत जळत होते सगळे गणगोत निघून गेले होते, त्यावेळेस त्या जळनाऱ्या प्रेताच्या उजेडात काही सापडतेय ते शोधत होते, स्मशानात फुटलेल्या मडक्याचे तुकडे होते एका तुकड्यात पाणी होते पाऊस नुकताच येऊन गेला होता त्यांनी एक तुकडा साफ केला त्यात पाणी टाकले, पदरातले पीठ टाकले आणि भिजवले, तळ हाताएवढी भाकरी झाली त्यात जळनाऱ्या प्रेतावरचे निखारे ओढले त्यावर भाकरी भाजली कटाकटा तोडून खाल्ली, त्याच तुकड्या मधील घोट भर पाणी प्यायले त्यादिवशी त्या तिथेच थांबल्या, गाव शेजारीच होते, त्यांनी इतक्या रात्री स्मशानात घालवल्या त्यांना काहीच वाटले नाही परंतु ज्या दिवशी त्यांनी स्मशानात भाकरी भाजून खाल्ली त्या रात्री 50 काळे काळे पक्षी आले त्यांना धडाधड टोच्या मारत होते त्यांच्या टोच्या त्यांच्या पातळाला लागत होत्या, त्यांचे पंख त्यांना लागत होते कारण ते त्यांना विचारत होते कि मेलेल्याचे खायचा अधिकार आमचा आहे तू अजून मेलेली नाहीस आमचा कायदा भंग झाला… तू आमचे उत्तर दे त्यांच्या कडे उत्तर न्हवते त्या फक्त बाळाला पोटाशी घेऊन जोरजोरात रडत होत्या कारण त्यांना त्या पक्ष्या चे पंख आणि टोच्या लागत होते आणि का रडत होते तर त्यांना गाव दिसत होते कारण गाव लागूनच होते त्या एवढ्या जोर जोरात रडत होते कि गावातले कोणतरी उठेल आणि दहा पाच लोकं स्मशानात येतील काय चालले ते पाहायला किती आशा असते ओ….
म्हणून भगवत गितेत म्हटले आहे…

‘ आशायम परमदुःखम ‘

त्या जोर जोरात रडत होत्या गावकरी उठले यांचे रडणं जोरात चालू होते त्यावेळेस गावकरी उठले दार उघडले सर्वांनी सर्वांना सूचना दिल्या कि अरे दारं पक्के बंद करा लेकरांना झाकून कोंडून ठेवा रात्री दार कोणी उघडू नका कारण आज स्मशानात भूत रडत आहे, माणसांनी बोलल्याले त्यांना ऐकायला येत होते त्यांच्याजवळ कोणीच आले नाही सर्वांनी दारं बंद केली त्या आकांताने रडत होत्या मात्र गावाचे कुत्रे त्यांच्या सोबत रडायला आले होते परंतु माणूस काही आलाच नाही त्या दिवशी त्यांनी ठरवले हे पक्षी तुला सांगत आहेत तू वेडी आहेस हे जग तुझे नाही कश्यातुनही आपल्याला प्रेरणा मिळते ती फक्त घ्यायची आपल्याला ताकद पाहिजे त्यादिवशीच त्यांनी हे स्मशान सोडले नंतर कधीच स्मशानात गेल्या नाहीत त्यांना त्यांचा मार्ग दिसला ते 3 वर्ष विचार करत होते कि ही त्यांच्या कार्याची सुरुवात आहे, ते विचार करत होते कि एक मुलगी घेऊन फिरण्या पेक्ष्या हजारोची आई बनू, एक कर तुला जर दुसऱ्याच्या बाळाची आई व्हायची असेल तर स्वतःचे बाळ जवळ ठेऊ नकोस कारण या मागे खूप मोठे कारण आहे कि त्या त्यांच्या मुलीला खाऊ घालून जोपवतील आणि सांभाळलेल्या मुलांना पाणी पाजून गाणं गाऊन जोपवतील, तुझ्या मधील आई चुकेल हे त्यांना पटले आणि ताईंनी त्यांची तीन वर्ष्याची मुलगी पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाय च्या गणपती संस्थान ला देऊन टाकली परंतु मुलगी देताना पोटात खड्डा पडला होता, मुलगी दिली, स्टेशन वर येऊन बसले जोरजोरात लोकं पलीकडे ओरडत होते कि कोणीतरी लेकरू टाकले त्यांनी जाऊन पहिले तर तिथे लेकरू कोणीतरी टाकले होते तोंडातुन रक्त येत होते त्यांनी उचलले आणि ते पडलेले बाळ उचलून त्या चिखल दऱ्याला निघून गेल्या ही त्यांची खरी सुरुवात होती ज्या दीपक ला यांनी पोटाशी घेऊन मोठं केलं वाढवलं आता सासवड ला तो 200 मुलं सांभाळतो त्याचा मुलगा ताईंना दिलेली सफारी चालवतो…. म्हणून जगात दिवस उगवतो.

ममता बाल सदन संस्था

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळी

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.

पुरस्कार व गौरव

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, त्यांतले काही :-

👉 पद्मश्री पुरस्कार (२०२१)

👉 महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)

👉 पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (२०१२)

👉 महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (२०१०)

👉 मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)

👉 आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)

👉 सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार

👉 राजाई पुरस्कार

👉 शिवलीला महिला गौरव पुरस्कार.

👉 श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (१९९२)

👉 सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (२०१२).

👉 २००८ – दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’.

👉 प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)

👉 डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)

👉 पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’

👉 पद्मश्री पुरस्कार (२०२१)

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपानिव येथील श्रीमती सुमन शामराव पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन.
Next articleपिलीव पत्रकार संघाच्या निवडी जाहीर, अध्यक्षपदी शुभजीत नष्टे तर सचिव पदी शाहरुख मुलाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here