मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी पालकांनी दिली पाहिजे – तेजस्विनी सातपुते
सोलापूर (बारामती झटका)
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह होत आहेत. ते रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांनी बालविवाहाला आळा बसविण्यासाठी समोर येणे आवश्यक आहे. बालविवाह रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सोलापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी सांगितले आहे.
मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयात बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर जनजागृती शिबिरात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. बालविवाह रोखण्यासाठी सातपुते यांनी स्वतः नरखेड हे गाव दत्तक घेतले आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना सातपुते म्हणाल्या की, मागील काळात महिला आयोगाचे पदाधिकारी सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर जिल्हा हा बालविवाह करण्यामध्ये सर्वात पुढे असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यात पोलिसांना काही वेळा यश आले तर काही वेळा अपयश आले. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील दोन पेक्षा जास्त बालविवाह झालेली गावे अधिकार्यांना दत्तक देण्यात आली आहेत. ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यामध्ये जबाबदारीने लक्ष घालणे गरजेचे आहे. मुलींची सुरक्षितता गरजेची असून पालकांनी काळजी करून मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांना ज्या क्षेत्रात जायचे आहे त्यामध्ये करियर करायची संधी दिली पाहिजे.
या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अशोक सायकर, हनुमंत पोटरे, जे. वाय. पाटील, शुक्राचार्य कोल्हाळ, विनोद पाटील, सरपंच बाळासाहेब मोटे, उपसरपंच सुवर्णा जाधव, सचिन शिंदे, बाळासाहेब गरड, संतोष कोळेकर, सविता धोत्रे, मनोज पाटील, ग्रामविकास अधिकारी तात्या नाईकनवरे, राहुल कसबे, नागेश पाटील, कुमार कादे, अरुण पाटील, दत्तात्रेय झेंडगे, गणेश झेंडगे, रमेश शिंदे, निलेश देशमुख, पोहेकॉ. गणेश पोपळे, पोहेकॉ. सत्यवान जाधव, अशोक धोत्रे, पोपट गायकवाड आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng