आदर्श शिक्षणाधिकारी पुरस्कार स्वीकारणारे डॉ. किरण लोहार आदर्श लाचखोर शिक्षणाधिकारी यांचा बुरखा चव्हाट्यावर
सोलापूर ( बारामती झटका )
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण अनंत लोहार (वय 49) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 25 हजाराची रक्कम स्वीकारताना अँटी चेंबरमध्ये रंगेहात पकडले. काही दिवसापूर्वी राज्यस्तरीय आदर्श शिक्षणाधिकारी पुरस्कार स्वीकारणारे आदर्श लाचखोर शिक्षणाधिकारी यांचा बुरखा चव्हाट्यावर आलेला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक या पथकाने केलेली आहे. त्यामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार सोनवणे, पकाले, पोलीस नाईक घाडगे, पोलीस शिपाई सन्याके उडाण शिव सर्व अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथील आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील एका स्वयंअर्थसहाय्य शाळेने वर्ग वाढीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांच्याकडे केलेली होती. त्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी 50 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केलेली होती. तडजोड करत 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तीच रक्कम स्वीकारताना सोमवार दि. 31/10/2022 सायंकाळी अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केलेली आहे.
डॉ. किरण अनंत लोहार यांचे मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असताना त्यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी लाचखोरीचे आरोप केलेले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेतून एकतर्फी कार्यमुक्त केलेले होते.
डॉ. लोहार यांनी कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून पीएचडी पदवी मिळवली होती. पीएचडी देणारी ही संस्था बोगस असल्याने शिक्षण संचालकाच्या चौकशीत उघड झालेले होते. सदरच्या टोंगा संस्थेच्या विरोधात पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये 2019 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. टोंगा या देशांनीही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतेही विद्यापीठ नसल्याचे जाहीर केलेले होते.
किरण लोहार हे टोंगा विद्यापीठामुळे डॉक्टर किरण लोहार बनले. किरण लोहार यांनी आदर्श शिक्षणाधिकारी म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार काही दिवसापूर्वी स्वीकारलेला होता. आदर्श शिक्षक पुरस्काराचा आनंद ओसंडून वाहत असताना अँटी करप्शन च्या 25 हजाराच्या लाचेसाठी कधी हातात बेड्या पडल्या, याची कल्पना सुद्धा राहिली नाही. अशा लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याच्या मुस्क्या अखेर सोलापूर अँटी करप्शन ब्युरो यांनी आवळल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng