सोलापूर जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात राज्यात तिसरा

सोलापूर (बारामती झटका)

दि. 13 मे 2022 रोजी पुणे येथे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, (यशदा) येथील सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) यांची आढावा सभा आयोजित केलेली होती.
सदर सभेस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील तसेच ऑनलाइन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग डॉ. प्रदीप व्यास व आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान एन रामास्वामी हे उपस्थित होते. या आढावा सभेमध्ये सन 2021- 2022 या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याने प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावला असून जिल्ह्यात covid-19 संसर्ग मोठ्या प्रमाणावर असतानाही माता व बालकांना वेळीच आरोग्य सेवा देण्यामध्ये जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. सोलापूर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या व लोकसंख्येने पहिल्या दोन क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या मानाने अतिशय मोठा असतानाही व आरोग्य यंत्रणेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून हे यश संपादन केले आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ज्यामध्ये जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या समन्वयाने तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यासह इतर विभागाचाही सहभाग घेऊन दर्जेदार आरोग्य सेवा देण्यामध्ये व जनजागृती करण्यात सोलापूर जिल्हा परिषद यशस्वी ठरली आहे.

प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत लवकरात लवकर (१२ आठवड्याच्या आत ) गरोदर माता नोंदणी, गरोदर मातेची तपासणी तसेच त्यांचे संदर्भ सेवा, बालकांचे लसीकरण, बालकांच्या संदर्भसेवा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत बालकांच्या तपासण्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम माझे मुल माझी जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे राबविल्यानंतर covid-19 संसर्ग मोठ्या प्रमाणावर असतानाही covid-19 लसीकरणा बरोबरच आरोग्य विभागाच्या टीमने या पण सेवा उत्तम रित्या लाभार्थ्यांना दिल्या. मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी अति जोखमीच्या गरोदर मातांचा पाठपुरावा, त्यांना रक्तक्षय जंतदोष यावरील उपचार, सोनोग्राफीची सेवा, गरोदर मातांच्या रक्ताच्या विविध चाचण्या, संस्थेत प्रसुती झाल्यास जेवणाची सोय तसेच सदर लाभार्थ्याला घरी सोडण्याच्या सोयीसह प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व जननी सुरक्षा योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळवून दिला.

लक्ष्य ( LAKSHYA) कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे अद्यावत प्रसूती कक्ष तसेच सांस (SAANS) कार्यक्रमाअंतर्गत सर्व आशा व आरोग्य कर्मचारी यांना न्युमोनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना याचे प्रशिक्षण देऊन माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रशिक्षित करण्यात आले.
जिल्ह्यात जापनीज एनकॅफेलाईटीस लसीकरण यशस्वीरीत्या राबवून शाळा अंगणवाडी बंद असतानाही इतर विभागांचा सहभाग घेऊन हा कार्यक्रम राबविण्यात आला.
तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी व पंचायतराज पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांचा लोकसहभाग घेऊन विविध शिबिरे घेतली व आरोग्य केंद्राची बाह्य रुग्ण व आंतररुग्ण संख्या वाढवण्यावर भर देण्यात आला.

Covid-19 चा संसर्ग कमी होताच जिल्ह्यातील सर्व शस्त्रक्रियागृह सुरु करून कुटुंब कल्याण कार्यक्रमात जिल्ह्याने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पार पडल्या. मातांच्या व बालकांच्या नियमित लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष च्या धर्तीवर सर्व लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून त्या लाभार्थ्यांसाठी अतिरिक्त लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरण करण्यात आले व संरक्षित करण्यात आले.
कोविड चे सर्व प्रोटोकॉल पालन करीत सेवा दिल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आरोग्य विभागाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे.

कोविड – १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर कोविड व्यतिरिक्त आरोग्य सेवा देण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. आरोग्य विभागाने नियोजनपूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याचे फळ आज मिळाले आहे. मी माझ्या सर्व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. भविष्यकाळात लोकसहभागातून अजून जास्त प्रभावीपणे सेवा देण्यावर भर राहील. – डॉ. शितलकुमार जाधव ( जिल्हा आरोग्य अधिकारी )

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleझी टॉकीज फेम ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन.
Next articleमाळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी जनता दरबारातून हमालाच्या पत्नीची केली कमाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here