माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्याने केंद्रीय लोकसेवा आयोगातून आणि राज्य लोकसेवा आयोगातून अनेक अधिकारी महाराष्ट्राला व देशाला दिले आहेत. त्यामधील बरेच अधिकारी देशाच्या विविध राज्यात तसेच देशाच्या बाहेर आणि खूप अधिकारी महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात केंद्र सरकारच्या प्रशासनात व राज्य सरकारच्या प्रशासनात आपली सेवा कर्तव्याने पार पाडत आहेत व तालुक्याचा नावलौकिक करत आहेत. तालुक्यातील युवा तरुणांसाठी काय तरी विधायक करायचे जेणेकरून मायभूमीची सेवा होईल या उद्देशाने एकत्र येऊन ‘माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान’ ची स्थापना केली. यात वर्ग-2 पासून आय.ए.एस. दर्जाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सर्वांनी मिळून निधी संकलन करून स्पर्धा परीक्षा केंद्र लवकरच सुरू होत आहे. सर्व अधिकारी गावी आल्यावर वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा करतील. स्पर्धा परीक्षमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवण्यात येणार आहे. तसेच गरजेला परीक्षेवेळी पुण्यातील नामांकित क्लासचे व्याख्यान ही आयोजित केले जाणार आहे.
महाराष्ट्रात सर्वांत कमी पाऊस सोलापूर जिल्हयात पडतो म्हणून सोलापूर जिल्हयाची ओळख दुष्काळी जिल्हा म्हणून आहे. याच जिल्हयातील माळशिरस तालुका माळाचं शिर असलेला तालुका आहे. पण याच तालुक्यात बुद्धिवंतांचा सुकाळ आहे, याच बुद्धिवंतांच्या जोरावर सोलापूर जिल्हयासह माळशिरस तालुक्याने देशाच्या व राज्याच्या प्रशासनात अनेक अधिकारी दिलेले आहेत.
आपण ज्या मायभूमीत जन्मलो, वाढलो, लहानाचे मोठे झालो त्या मायभूमीचे देणे लागतो हा उदात्त आणि चांगला हेतू डोळ्यासमोर ठेवून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या गरजू विद्यार्थांना दिल्ली, पुणे, मुंबई येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गरीब परिस्थितीमुळे जाता येत नाही, अशा विद्यार्थाना माळशिरस या तालुक्याच्या ठिकाणी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित, माळशिरस तालुका अधिकारी यांच्यावतीने माळशिरसमध्ये लवकरच मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका सुरु होत आहे.
घार फिरे आकाशी, चित्त तिचे पिल्लाशी, या म्हणीप्रमाणे माळशिरस तालुक्यातील भूमीपुत्र प्रशासनात सेवा बजावण्यासाठी देशभरात आणि राज्यभरात विखुरलेले आहेत ते आपल्या प्रशासनात अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. तालुक्यातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चांगला उपक्रम राबवला आहे. तरी गरजू स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी आजच आपले नाव नोंद करून दिलेल्या संधीचे सोने करावे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng