वन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय उर्फ दत्तामामा भरणे यांनी सामाजिक वनीकरण विभागाची चौकशी करून भ्रष्ट व सुस्त अधिकाऱ्यावर कारवाई करावी, हनुमान भक्तांची मागणी.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील तामशिदवाडी व मारकडवाडी सरहद्दीवर गोरेवस्ती येथील जागृत देवस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान असणारे हनुमान मंदिर परिसरामध्ये सामाजिक वनीकरण विभागाने मंदिर परिसरात वृक्षारोपण केलेले आहे. सध्या पाण्याअभावी लागवड झालेली रोपे जळून चाललेली आहेत. वन विभागाच्या रामभरोसे कारभाराकडे दत्तात्रय यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे हनुमान भक्तातुंन बोलले जात आहे. सध्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय उर्फ दत्तामामा भरणे यांच्याकडे वन विभागाचा राज्यमंत्री पदाचा कार्यभार आहे. सामाजिक वनीकरण विभागाची चौकशी करून भ्रष्ट व सुस्त अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी हनुमान भक्तांमधून मागणी होत आहे.

गोरेवस्ती येथील हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असणारे मारुती मंदिर या ठिकाणी विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी सदर मंदिराचा क वर्गामध्ये दर्जा देण्यासाठी प्रयत्न करून क वर्ग मधून मंदिर व परिसर विकास करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. संगीताताई मोटे यांनीही निधी देऊन मंदिरास मदत केलेली आहे. माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचेही मंदिर परिसरासाठी हायमास्ट दिवा व परिसर सुशोभीकरणासाठी निधी देण्याचे काम सुरू आहे.

मंदिराचा परिसर जवळजवळ दहा ते अकरा एकर जमीन ग्रामपंचायत मालकीची गायरान आहे. त्या ठिकाणी आमदार राम सातपुते व संस्कृती सातपुते यांनी हनुमान भक्तांसाठी निसर्गरम्य भौगोलिक ठिकाण असणाऱ्या हनुमान मंदिर परिसरात 3333 चिंच व इतर वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे. भविष्यामध्ये चिंचेच्या फळापासून हनुमान मंदिराला उत्पन्न मिळावे हा उदात्त हेतू ठेवून ते 3333 वृक्ष लागवड केली. मात्र, वनीकरणाच्या अधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने वृक्षारोपणाकडे 33 चे 36 झाले असे वाटत आहे. वृक्षारोपण केल्यापासून अवकाळी पाऊस, गारपीट याचा फायदा होऊन आज पर्यंत वृक्षारोपण केलेली चिंचेची रोपे वनीकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसताना निसर्गावर तरलेली आहेत. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे, त्यामुळे कृत्रिम पाण्याची आवश्यकता आहे. रोपांना पाणी दिसत नाही. जवळच बंधारा आहे. रोपांच्या जवळ पाणी आहे मात्र भ्रष्ट व सुस्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रोपे जळून चाललेली आहेत “पाणी उशाला आणि कोरड घशाला” अशी अवस्था रोपांची झालेली आहे. हनुमान मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण केल्यापासून अधिकारी फिरकले नाहीत. सदर ठिकाणी वृक्ष संवर्धन व जतन करण्याकरता एकही कामगार ठेवलेला नाही. स्थानिक नागरिक यांनी जोपासलेली रोपे सध्या जळून चाललेली आहेत. वनविभागाच्या राम भरोसे कारभाराकडे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. हनुमान मंदिरासारखी कितीतरी ठिकाणी माळशिरस तालुक्यात वृक्षारोपण करून कागदोपत्री खर्च ठेवलेला आहे. याचीही खात्री करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि लवकरात लवकर हनुमान मंदिर परिसरातील रोपांचे संवर्धन आणि जतन करण्याकरता अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी हनुमान भक्तांकडून होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng