भटक्या विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजातील आदर्श व्यक्तिमत्व सहाय्यक निबंधक नाथासाहेब गणपत शेगर यांचे प्रथम पुण्यस्मरण.
माळशिरस (बारामती झटका )
मेडद ता. माळशिरस येथील भटक्या विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजातील आदर्श व्यक्तिमत्व सहाय्यक निबंधक नाथासाहेब गणपत शेगर यांच्या मंगळवार दि. 19/10/2021 रोजी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. प्राध्यापक प्रसाद महाराज माटे चऱ्होलीकर यांचे सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये शेगर यांच्या मेडद ता. माळशिरस येथील निवासस्थानी सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

मेडद येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजातील गणपत शेगर व सोनाबाई शेगर सर्वसामान्य असणारे हे कुटुंब. यांच्या कुटुंबामध्ये नाथासाहेब शेगर यांचा जन्म झालेला होता. त्यांना एकूण सहा भावंडे होती. पूर्वीच्या काळी प्रतिकूल परिस्थितीत भटका विमुक्त समाजाचे अशिक्षित लोक काहीतरी व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होते. अशा कठीण परिस्थितीत नाथासाहेब शेगर यांनी आपले शिक्षण पूर्ण करून सहाय्यक निबंधक म्हणून ते नोकरी लागलेले होते. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील ते पहिले अधिकारी होते. त्यांनी अकलूज, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा, माढा, वडूज, दहिवडी अशा ठिकाणी नोकरी केलेली आहे. त्यांनी नोकरी करीत भटका विमुक्त असणारा नाथपंथी डवरी समाजामध्ये अमुलाग्र बदल केले. नाथासाहेब यांचे वडील गणपत व आई सोनाबाई यांना आपल्या मुलाचा अभिमान होता. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अधिकारी बनलेल्या आपल्या मुलाच्या नोकरीचा कार्यकाल त्यांनी पाहिलेला होता. गेल्या पंधरा वर्षापूर्वी नाथासाहेब यांच्या आई वडिलांचे दुःखद निधन झालेले होते. नाथासाहेब यांना सहा मुली व एक मुलगा. त्यापैकी एका मुलीला त्यांनी वकील बनवले. नाथासाहेब यांनी आपल्या सर्व मुलींची उद्योग, व्यवसाय व नोकरदार यांच्याशी विवाह लावून दिले आहेत. घरातील भावांना सुद्धा सहकार्य करून सर्वांचे प्रपंच सुस्थितीत आणलेले होते. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील व इतर समाजातील लोकांना सहकार्य करण्याची नाथासाहेब यांची भूमिका होती. सर्व जाती धर्मात त्यांना आदराचे स्थान होते. मेडद गावामध्ये जागृत श्री नाथाचे मंदिर आहे, या मंदिराच्या जीर्णोद्धार व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असायचा. आपण अधिकारी आहे याचा त्यांना कधी गर्व नव्हता मात्र, अधिकारी असल्याचा सर्वांना फायदा करून दिला. त्यांच्या धर्मपत्नी विमल व मुलगा ज्ञानेश्वर उर्फ नितीन यांनीही नाथासाहेब शेगर यांना चांगली साथ दिलेली होती. गेल्यावर्षी नाथा साहेब यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आलेला होता. दवाखान्यामध्ये उपचार सुरू होते, अशावेळी पहिल्या लाटेतील कोरोना संसर्ग रोगाची लागण झालेली होती, अशामध्येच साहेबांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवारासह नाथपंथी डवरी गोसावी व इतर समाजामध्येही त्यांच्या मृत्यूमुळे पोकळी निर्माण झालेली होती. भटक्या विमुक्त समाजामध्ये आदर्श व्यक्तिमत्व असणारे नाथासाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झी मराठीवर कीर्तनाचा जागर यामधील सर्वेसर्वा असणारे ह.भ.प. प्रसाद महाराज माटे यांचे सुश्राव्य समाज प्रबोधनपर कीर्तन होणार आहे. तरी पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसाद यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीमती विमल नाथासाहेब शेगर, श्री. ज्ञानेश्वर उर्फ नितीन नाथासाहेब शेगर व समस्त शेगर परिवार व समस्त मेडद ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng