निरंतर योगसाधना, साधे राहणीमान आणि निस्वार्थ सेवाभाव
मुंबई (बारामती झटका)
स्वामी शिवानंद वय १२५ वर्ष पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी हे युवक महर्षी समोर आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः त्यांना वाकून नमस्कार केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देखील पुढे आले आणि त्यांना उभे राहण्यास मदत केली. स्वामी शिवानंद यांची देशभरात चर्चा आहे. स्वतः मोदी त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. त्यामुळे त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली. या योग महर्षीबाबत चकित करणाऱ्या काही गोष्टी जाणून घेऊयात.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणारे स्वामी शिवानंद हे सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती आहेत. त्यांचा जन्म वाराणसीत ऑगस्ट १८९६ मध्ये झाल्याचे बोलले जाते. या वयातही दररोज तासनतास योगसाधना करण्याचे त्यांच्यात सामर्थ्य आहे. त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे लक्ष वेधले गेले. साधे राहणीमान आणि साधा आहार असं त्यांचं आयुष्य आहे.
स्वामी दररोज पहाटे ३ वाजता उठतात. कोणाचीही मदत न घेता ते दररोज योगासने करतात. कोणतीही वैद्यकीय गुंतागुंत नसून ते पूर्णपणे फिट आहेत. स्वामी ६ वर्षांचे होण्यापूर्वीच त्यांचे आई-वडील आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यांनी कुटुंबीयांचे अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आणि ब्रह्मचर्याचा मार्ग निवडला. स्वामिनी आयुष्य समाजासाठी अर्पण केले. ते म्हणतात, विश्व हे माझे घर आहे. या जगातील सर्व लोक माझे आई-वडील आहेत. त्यांच्यावर प्रेम करणे आणि सेवा करणे हाच माझा धर्म आहे. निरोगी आयुष्यासाठी योग्यसाधनेचाच मार्ग आहे, असा स्वामींचा ठाम विश्वास आहे. योगामुळे मन, इच्छा आणि संवेदनांवर नियंत्रण मिळवता येते. ईश्वर आणि ज्ञानाकडे जाण्याचा हा मार्ग आहे.
स्वामींचे वय १२५ वर्षे आहे. दररोज योगसाधना, तेलरहित आणि उकडलेला आहार, मानवाप्रती निस्वार्थ सेवा हे त्यांच्या निरोगी आणि शिस्तप्रिय आयुष्याचे रहस्य आहे. गेल्या ३ दशकांपासून ते काशीच्या घाटांवर स्वतः योग करतात आणि इतरांना शिकवतात. गेल्या पन्नास वर्षांपासून ते पुरी येथील कुष्ठरोग्यांची सेवा करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng