बबनदादांवरील शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी पांडुरंगाला साकडे घालणार – ह. भ. प. महंत प्रभाकर शास्त्री महाराज

माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने श्री संत ज्ञानराज माऊलींच्या पालखीचे स्वागत व पूजन; 300 रेनकोटचे वारकऱ्यांना वाटप
माढा (बारामती झटका)
माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन माजी आमदार बबनदादा शिंदे याचे सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरीब जनता व शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. त्यांनी फार मोठे पुण्यकर्म केले आहे. बबनदादांच्या रूपाने मतदारसंघातील जनतेला देवअवतारी व्यक्तिमत्व लाभले आहे.
सध्या त्यांची प्रकृती अस्वस्थ्य आहे, त्यामुळे ते अमेरिकेत शस्त्रक्रियेसाठी गेले आहेत. त्यांच्यावरील हृदय शस्त्रक्रिया यशस्वी होऊन ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा समाजसेवेसाठी सक्रीय व्हावेत यासाठी आम्ही आमच्या पायी दिंडीतील सर्व वारकरी पांडुरंगाला साकडे घालणार असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. महंत प्रभाकर शास्त्री महाराज यांनी केले आहे.
ते माढा येथे माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने श्री संत ज्ञानराज माऊली यांच्या दिंडीचे स्वागत व पादुकांचे पूजन करताना मंगळवार दि. 1 जुलै रोजी बोलत होते.
मागील 13 वर्षापासून श्री क्षेत्र पावनधाम आश्रमचे अध्यक्ष ह. भ. प. महंत प्रभाकर शास्त्री व जालना जिल्ह्यातील डोंगरगाव चे दिंडी चालक ह. भ. प. उद्धव घनगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र पावनधाम आश्रम ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता पायी दिंडी सोहळा माढा येथे आल्यानंतर माऊलीच्या पादुका व पालखीचे पूजन माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत व त्यांच्या पत्नी बँकेच्या माजी संचालिका मंगल लुणावत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की, पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखों भाविक व वारकरी शेंकडों मैल ऊन, वारा, पाऊस, थंडी, चिखल यांची कसलीही तमा न बाळगता पायपीट करून आषाढी एकादशीला जातात तेव्हा, त्यांचे मन प्रसन्न व आत्मा तृप्त होतो. प्रत्येकाने भक्तीमार्गालाच खरी संपत्ती मानली पाहिजे. जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने पांडुरंगाची मनोभावे भक्ती व सेवा केल्यास खरे आत्मिक समाधान लाभते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ह. भ. प. उद्धव घनगाव महाराज यांनी सांगितले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाताना आमचे स्वागत व व्यवस्था अनेक दानशूर व्यक्ती करतात. माढा येथे बँकेचे चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे व उपाध्यक्ष अशोक लुणावत हे अत्यंत चांगल्या पद्धतीची व्यवस्था व आदरातिथ्य आणि सन्मान करतात. ही परंपरा अशीच कायमस्वरूपी सुरू राहो, अशी अपेक्षा त्यांनी माजी आमदार बबनदादा शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून ईश्वराकडे साकडे घातले.
यावेळी माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांनी पायी दिंडीतील सर्व वारकरी व भाविक भक्तांसाठी 300 रेनकोटचे वाटप, महाप्रसाद, फराळ, चहा-पाणी व साई पब्लिक स्कूल येथे मुक्कामाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. बँकेच्या वतीने श्री संत ज्ञानराज माऊली पायी दिंडीची व्यवस्था करण्याचे हे सहावे वर्ष आहे.
यावेळी ह. भ. प. उध्दव घनगाव महाराज, माढेश्वरी बँकेच्या संचालिका विपुला लुणावत, मंगल लुणावत, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे, प्राचार्य रवींद्र सुरवसे, नंदकुमार छाजेड, शशिकांत छाजेड, इंजिनिअर अभिजित लुणावत, वसुली अधिकारी राजकुमार भोळे, वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, सुरज कंचलवार, शिवाजी घाडगे, विक्रम पाटील, विणाकरी नारायण गवारे, चोपदार रणजित शिनगारे, गणेश गवारे, बळीराम गवारे, ओम घनघाव, समाधान भांगे, विजय मुळे, अक्षय कवटे, आदित्य भांगे, अमरदिप मोरे, संदीप गोरे यांच्यासह शेकडों वारकरी व भाविकभक्त उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



