युपीएससी चे गुण कळतात, मग ‘नवोदय’चे का नाही ?

पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांत संभ्रम ?
माळशिरस (बारामती झटका)
आपल्या देशात जिल्हा अधिकारी, सचिव यांची निवड करणाऱ्या यू.पी.एस.सी. लेखी परीक्षेचे व तोंडी मुलाखतीचे गुण जाहीर केले जातात, मात्र नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वी साठीच्या प्रवेश परीक्षेबाबत कमालीची गोपनीयता ठेवून ना उत्तरसूची जाहीर होते, ना मार्क जाहीर केले जातात. याबाबत पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांत संभ्रम आहे. सर्वच विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करावेत, प्रतिक्षा यादी लावली जावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नवनाथ धांडोरे यांनी नवोदय विद्यालय समितीकडे केली आहे.
भविष्यातील अधिकारी घडवणारी, गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी ही संस्था केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत चालवण्यात येते. जवाहर नवोदय विद्यालयाच्या ६ वी साठीच्या प्रवेश पात्रता परीक्षेला मोठा प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत या जवाहर नवोदय विद्यालयांची निर्मिती झाली. १९८६ मध्ये या विद्यालयांची स्थापना जिल्हावार सुरू झाली. आताच्या घडीला देशात एकूण ६६१ नवोदय विद्यालये कार्यरत आहेत. सेंट्रल बोर्डाचा अभ्यासक्रम या विद्यालयांमध्ये शिकवला जातो.
प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा देतात. मात्र, निकाल जाहीर होताना फक्त “निवड” किंवा “निवड नाही” अशी माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीचा अंदाज येत नाही, तसेच भविष्यात सुधारणा करण्यासाठी कोणत्या घटकांवर मेहनत घ्यावी याची कल्पना मिळत नाही.
“जेव्हा इतर राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कळू शकतात, तेव्हा नवोदय परीक्षेत हे का शक्य नाही ?” असा सवाल त्यांनी केला.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी नवोदय विद्यालय समितीने परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता समिती यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दहा हजार पेक्षा जास्त मुले प्रत्येक जिल्ह्यातून परीक्षा देतात. त्यापैकी फक्त ऐंशी मुले निवडली जातात. पैकीच्या पैकी गुण मिळवणारी मुले ही जास्त असतील तर कोणते निकश लावले जातात, हे जाहीर केले जावेत. नवोदय विद्यालयाबरोबरच देशात संरक्षण मंत्रालय 33 सैनिक शाळा चालवते. याच्या होणाऱ्या परीक्षेचे गुण कळवले जातात. गुणवत्ता यादी, प्रतिक्षा यादी जाहीर केली जाते. सैनिक शाळेत दीड ते दोन लाखांपर्यंत फी दर वर्षी असते. केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले पालकच तिथे प्रवेश घेतात. नवोदय विद्यालय मात्र नाममात्र फी घेते म्हणून तर ही तफावत नाही ना ?, असाही प्रश्न नवनाथ धांडोरे यांनी उपस्थित केला आहे.
शैक्षणिक प्रवासामध्ये नवोदयमधील शिक्षणाला वेगळे महत्त्व आहे. इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतची शिक्षणाची, निवास व भोजनासह सोय एक रुपयाही न घेता दर्जेदारपणे या ठिकाणी असते. यासाठी इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना नवोदयची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. शिष्यवृत्ती किंवा स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवरील ही परीक्षा देऊन विद्यार्थ्यांला या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक अपार कष्ट घेत असतात. शहरी व ग्रामीण अशा दोन प्रकारात व पुन्हा मुली व इतर आरक्षणाद्वारे या विद्यार्थ्यांची निवड होत असते. मात्र, या साऱ्या प्रक्रियेत अत्यंत वेदनादायी गोष्ट म्हणजे नवोदयच्या प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल केवळ पात्र विद्याथ्यांची यादी या स्वरूपातच सादर केली जाते.
परीक्षांमध्ये निकाल जाहीर करताना एकूण मेरीट लिस्ट लावली जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला किती मार्क मिळाले हे समजते. तसेच गुणवत्ता यादीचे किती मेरीट आहे ते पण समजते. मात्र, नवोदयच्या निकालामध्ये पात्र झालेल्या व न झालेल्या कोणाही विद्यार्थ्यांचे गुण जाहीर केले जात नाहीत, याबाबत विचारणा केल्यास पालकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी व मार्गदर्शक यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. गुणा जाहीर करण्यास अडचण काय ?, असा सवाल उपस्थिता होत आहे. या प्रवेश परीक्षेसाठी शाळा व मार्गदर्शन मोठा प्रयत्न करीत असतात. या परीक्षेतील यश हा गुणवत्तेचा एक महत्वाचा निकष असतो. त्यामुळे विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचला हे समजण्यासाठी गुण जाहीर होणे आवश्यक आहे. याबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश मिळावा म्हणून लाखो चिमुकले विद्यार्थी प्रयत्न करतात. सर्वांची निवड होणे शक्य नाही मात्र, किती गुण मिळाले हे समजले जावे. यामुळे पारदर्शकता वाढेल, शंकेस वाव राहणार नाही. निवड का झाली नाही, या मुलांच्या प्रश्नांवर निरुत्तर होण्याची वेळ पालकांवर येणार नाही. – नवनाथ धांडोरे पालक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.