आ. रणजीतसिंह मोहिते पाटील नॉट रिचेबल, अकलूज नगर परिषद निवडणूकीत आलीप्त मात्र, लग्नात आवर्जून उपस्थित…

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आ. रणजीतसिंह मोहिते पाटील हजार सदस्यांसह गायब मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला मात्र आवर्जून उपस्थित..
अकलूज (बारामती झटका)
आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणार्या अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच अकलूज नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील नगरपरिषद निवडणुकीत नॉट रिचेबल, निवडणुकीत अलिप्त आहेत मात्र, अकलूजसह तालुक्यातील लग्न समारंभाला आवर्जून उपस्थित राहत आहेत. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यता अभियानामध्ये सहभाग घेऊन भाजपचे सक्रिय हजार सदस्यांची नोंद केलेली होती. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील 1000 सदस्यांसह निवडणुकीतून गायब झालेले आहेत मात्र, अकलूज नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या, त्या वेळेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती घेत असताना भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील आवर्जून उपस्थित होते. अशी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची उमेदवारी डावलल्यानंतर समाज माध्यमातून व राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू आहे.
सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी मोठे विधान केलेले होते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात होतील, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी ठाम असून रणजीतदादांना वाळीत टाकले आहे, असे त्यावेळेस विधान केलेले होते. लोकसभेला रणजीतसिंह नाईक निंबाळकर व विधानसभेला राम सातपुते निवडणुकीत भाजप व महायुतीचे अधिकृत उमेदवार उभे असताना आमदार मोहिते पाटील भाजपचे असतानासुद्धा विरोधी उमेदवारांच्या समवेत असलेले सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भाजपशी गद्दारी केलेली आहे, त्यांची हकालपट्टी करावी असा सूर उमटलेला होता. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतलेली असल्याने भाजपने आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विकास कार्यक्रम उद्घाटन व पक्षीय कार्यक्रमातून वगळले होते.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी समाज माध्यमांमधून माळशिरस तालुक्यात माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असे सांगितल्यानंतर मोहिते पाटील व रणजीतसिंह मोहिते पाटील यांची गोची झालेली होती. तरीसुद्धा आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते मात्र, भाजपने धुडकावून लावलेले होते.
अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप व महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय गट अशा तीन प्रमुख गटामध्ये निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र विकास सेना यांनीही उमेदवार उभे केलेले आहेत.
भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एक हजार सदस्य करणाऱ्यांना शुभेच्छापर अभिनंदनचे पत्र कार्यालयाकडून दिले जात होते. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना सुद्धा 1000 सदस्य केल्याबद्दल प्रदेश कार्यालयाकडून शुभेच्छापत्र आलेले होते. तर दुसरीकडे भाजपमधून हकालपट्टीची मागणी होत होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या शुभेच्छा पत्रावरून मोहिते पाटील समर्थक व रणजीतदादा प्रेमी यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला होता. त्यामुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यात संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र तो संभ्रम अकलूज नगर परिषद निवडणुकीत दूर केलेला आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वात अकलूज नगर परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तालुक्यात व विशेष करून अकलूज पंचक्रोशीत लग्न कार्याला जाणीवपूर्वक उपस्थित राहत आहेत मात्र, निवडणुकीत सक्रिय झालेले नाहीत. मात्र, भाजप पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे अंतस्थ राजकारण सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याची पूर्णपणे कल्पना आहे. ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे, मांजर जरी डोळे झाकून दूध पीत असले तरी इतर लोकांचे डोळे उघडे असतात. त्यामुळे मांजराला वाटते आपल्याकडे कोणाचेच लक्ष नाही, अशीच परिस्थिती अकलूज नगर परिषद निवडणुकीनंतर आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची होईल, अशी राजकीय वर्तुळात व भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



