विधानपरिषदेला रणजितदादांचा नम्र नकार!; ‘दिल्ली’तच पुन्हा धडकण्याची शक्यता ?

मुंबई (बारामती झटका)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात आणि मीडियामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची विधानपरिषदेसाठी (MLC) जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, रणजितदादांनी विधानपरिषदेच्या या संधीला अत्यंत नम्रपणे नकार दिला आहे. पदाचा कोणताही मोह न बाळगता त्यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या पक्षनिष्ठेची आणि वेगळ्या राजकीय ‘व्हिजन’ची साक्ष देणारा ठरला आहे.
पदापेक्षा पक्षाचा आदेश महत्त्वाचा
विशेष म्हणजे, रणजितदादांना यापूर्वीही काही वर्षांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी विधानपरिषदेसाठी त्यांचे नाव जवळपास अंतिम केले होते. परंतु, त्यावेळीही त्यांनी या पदाला अतिशय नम्रपणे नकार दिला होता. “कोणत्याही पदापेक्षा मला पक्षाचे काम करणे महत्त्वाचे वाटते. पक्षश्रेष्ठी मला जो आदेश देतील, ती जबाबदारी मी चोखपणे आणि निष्ठेने पार पाडेन,” अशी स्पष्ट व ठाम भूमिका त्यांनी त्यावेळीही घेतली होती आणि आजही ते त्याच भूमिकेवर ठाम आहेत.
केंद्रातील ‘हाय पॉवर कमिटी’ आणि संसदेचा अनुभव
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाचा आवाका हा मुळातच राष्ट्रीय पातळीवरचा राहिला आहे. त्यांनी देशाच्या संसदेत अतिशय प्रभावीपणे काम केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांना संसदेत काम करण्याचा मोठा आणि प्रत्यक्ष अनुभव आहे.
केवळ खासदार म्हणूनच नव्हे, तर केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध ‘हाय पॉवर कमिटी’वर त्यांनी आपला भक्कम ठसा उमटवला आहे. यामध्ये प्रामुख्याने गृह खाते, जलसंपदा आणि रस्ते वाहतूक यांसारख्या देशाच्या विकासाचा कणा असलेल्या मंत्रालयांच्या समित्यांचा समावेश आहे. या समित्यांवर काम करताना त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ आणि फलटणसाठी हजारो कोटींचे प्रकल्प मार्गी लावले आहेत.
पुन्हा दिल्लीतच दिसणार दबदबा ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय नेतृत्वाशी असलेले त्यांचे थेट व घनिष्ठ संबंध, तसेच संसदेतील त्यांच्या कामाचा दांडगा अनुभव पाहता, पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरचीच मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. त्यामुळे रणजितदादा राज्याच्या राजकारणात (विधानपरिषदेत) न रमता, आगामी काळात पुन्हा एकदा संसदेतच (दिल्लीत) धडाकेबाज काम करताना दिसतील, अशी दाट शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



