विठ्ठलराव शिंदे बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न; दोन्ही युनिट्समधून 26 लाख मेट्रिक टन गाळप करणार – आ. बबनदादा शिंदे
बेंबळे (बारामती झटका)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर युनिटी एक व करकंब युनिट दोन मधून आगामी 2024-2025 गळीत हंगामात २६ ते २८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा मानस असून त्या दृष्टीने दोन्ही युनिट्सची तयारी पूर्ण झालेली आहे, असे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे. ते विठ्ठलराव शिंदे च्या पिंपळनेर युनिट एकच्या 24 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वामनराव उबाळे होते. या निमित्त संचालक सचिन देशमुख व त्यांच्या धर्मपत्नी सोनाली देशमुख यांचे हस्ते कारखाना कार्यस्थळावर सकाळी सत्यनारायणाची पूजा करण्यात आली व विधियुक्त होम हवन कार्यक्रम संपन्न होऊन आमदार बबनदादा शिंदे व मान्यवरांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी माजी सभापती विक्रमदादा शिंदे, माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे, संतोष अनभुले, सुहास पाटील जामगावकर, धनाजी जवळगे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे तसेच नागेश खटके, श्रीकांत लोंढे, सचिन होदाडे आदी मान्यवर विशेष करून उपस्थित होते.
याविषयी अधिक बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, मागील हंगामात दोन्ही युनिटमध्ये 25 लाख टन उसाचे गाळप करून प्रति टन 2900 रुपये दर दिला आहे. तसेच फेब्रुवारी व मार्च मधील उशिरा आलेल्या उसाला 50 ते 150 रुपयापर्यंत वाढीव दर दिला आहे. त्यामुळे मार्चमधील उसाला 3050 रुपये प्रति टन दर मिळाला आहे तर एकूण एफआरपी पेक्षा चारशे रुपये जास्त दिलेले आहेत. आगामी गळीत हंगामासाठी 50 हजार हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध असून १ हजार बैलगाड्या, १ हजार ट्रॅक्टर, ११ हार्वेस्टर मशीन ऊस तोडणी व वाहतुकीसाठी करारबद्ध केले आहेत व सर्वांचे ॲडव्हान्स पैसे पूर्ण दिलेले आहेत. तसेच ऊस कामगार टोळ्या आणणे व हंगाम अखेर परत पोहोचवण्याच्या कामी वाहन मालकांना एक वेळेसचे भाडे यावर्षीपासून येणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस तोडणीची घाई करू नये, आपल्या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे कारण दहा दिवसाला ऊस बिल देणारा आपला एकमेव कारखाना आहे. यापुढे उसाची एकरी उत्पादन क्षमता वाढवून (रिकवरी) साखर उतारा वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणार आहेत. या हंगामात पिंपळेर युनिट एक हा प्रतिदिन 14 हजार मेट्रिक टन तर करकंब युनिट दोन प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप करणार आहे. त्यामुळे आगामी हंगामात दोन्ही युनिटमध्ये एकूण २६ ते २८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचा आमचा मानस आहे. या हंगामामध्ये उसापासून डायरेक्ट इथेनॉल करण्याची परवानगी आलेली असल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना प्रति टन दर देण्यास चांगला फायदा होणार आहे. कारखान्यास मिळणारे यश हे शेतकरी तोडणी वाहतूकदार, सभासद, कर्मचारी, अधिकारी, सहयोगी शेतकऱ्यांचे असून कामगारांना दोन महिन्याचा पगार बोनस देण्यात येणार आहे.
पुढे बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, आपण नेहमीच ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करतो. त्यामुळे कारखाना माध्यमातून काशीयात्रा, बुद्ध गया दर्श,न अजमेर ट्रीप, आरोग्य शिबीर, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर, शैक्षणिक मदत इत्यादी उपक्रम दरवर्षी राबवले जातात. यामध्ये जनसेवा हाच उद्देश असून कोणताही स्वार्थ नसतो.
युनिट नंबर दोन करकंबबद्दल आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या युनिटबद्दल विरोधकांकडून कसलेही आरोप होऊ लागले आहेत. परंतु, मेसर्स शिवरत्न उद्योग समूह अकलूज अंतर्गत असलेला विजय शुगर हा बंद पडलेला कारखाना बँक लिलावात १२५ कोटी रोख भरून विकत घेतला आहे. त्यामुळे विजय शुगरच्या कोणत्याही जुन्या व्यवहारातील देणे देण्याचा आमचा काहीही संबंध नाही. सध्या आमचेवर खुनशी भावनेने निष्कारण आरोप केले जात आहेत. पण जनतेला हे सर्व काही माहित आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही जण ३ हजार ५०० रुपये प्रति टन दर जाहीर करतात. परंतु, ही शुद्ध धूळफेक आहे. पण प्रत्यक्षात काय दर देतील यापेक्षा आपला दोन रुपये दर जास्त राहील, हे निश्चित असेही दादांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी धनाजी जवळगे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, नागेश खटके, श्रीकांत लोंढे, सचिन होदाडे यांचेसह सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश बागल यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
nagano tonic: nagano tonic
nagano tonic: nagano tonic