विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या हंगामाची सांगता… उत्पादीत 7 लाख 9 हजार 555 व्या साखर पोत्याचे पुजन संपन्न

कामगारांना पंधरा दिवसाचा पगार बक्षीस देणार – मा. आ. बबनराव शिंदे
पिंपळनेर (बारामती झटका)
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर या कारखान्याचे सन २०२४-२५ या हंगामाची सांगता व ७ लाख ९ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पुजन दि. १८/२/२०२५ रोजी संस्थापक चेअरमन मा. आ. बबनराव शिंदे यांचे शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाले.
या हंगामात आजअखेर युनिट नं. १ कडे ११ लाख १६ हजार ८१८ मे. टन ऊसाचे गाळप होवून १०.८४ टक्के साखर उतार्याने ७ लाख १० हजार ८०० क्विंटल साखर पोती उत्पादीत झाली आहेत. तसेच युनिट नं. २ कडे ३ लाख ७५ हजार ७३८ मे. टन ऊसाचे गाळप होवून १०.९५ टक्के साखर उता-याने ३ लाख ५६ हजार ५०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. दोन्ही युनिट चे मिळून १४ लाख ९२ हजार ५५६ मे. टन गाळप होवून १० लाख ६७ हजार ३०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे. दोन्ही युनिटचे मिळून ५ कोटी ३५ लाख ९१ हजार ५०० युनिट वीज विक्री करण्यात आलेली आहे. या हंगामामध्ये युनिट नं. १ चे डिस्टीलरी विभागाकडे शुगर सिरप पासून २ कोटी २१ लाख ब. लि. इथेनॉल व २ कोटी ७१ लाख ४७ हजार स्पिरीट उत्पादन झाले आहे.
या हंगामासाठी ऊसाची उपलब्धता कमी प्रमाणात असल्याने हंगाम लवकर बंद झाला. सर्वच कारखान्यांना ऊसाची कमतरता भासली. त्यामुळे साखर कारखान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. नुकतीच केंद्रशासनाने साखर निर्यातील परवानगी दिल्याने साखर कारखान्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे, असे संस्थापक चेअरमन मा. आ. बबनराव शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
तसेच या हंगामात दोन्ही युनिटकडे गाळपास आलेल्या ऊसास हंगामाचे सुरूवातीपासून २० दिवसाला ऊस बिलाचे पेमेंट अदा केलेले आहे. या हंगामात गाळपास आलेल्या ऊसास प्रति मे.टन रू. २८००/- प्रमाणे अदा करण्यात आले असून या हंगामात ऊस बिलापोटी आजअखेर रू. ३४३ कोटी २१ लाख व तोडणी वाहतूक बिलासाठी रू. ७८ कोटी ७२ लाख अदा करण्यात आले आहेत. दोन्ही युनिट कडील यशस्वी कामकाजासाठी कारखान्यात काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांना पंधरा दिवसाचा पगाराइतकी रक्कम बक्षिस म्हणून अदा करण्यात येणार आहे. हा हंगाम सभासद, ऊस पुरवठादार, ऊस तोडणी मजूर, वाहनमालक, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्याने यशस्वी झाला असल्याचे मा. आ. बबनराव शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
गळीत हंगाम सांगता समारंभानिमित्त व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा पार पडली. कार्यक्रमाच्या सुरूवातीस कै. विठ्ठलराव शिंदे यांचे प्रतिमेचे पुजन व गव्हाण पुजन उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले. या हंगामात उत्पादीत ७ लाख ९ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पुजन संचालक सुरेश बागल व पांडूरंग घाडगे यांचे शुभहस्ते पार पडले.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, संचालक लक्ष्मण खुपसे, शिवाजी डोके, रमेश येवले पाटील, वेताळ जाधव, लाला मोरे, पांडूरंग घाडगे, तज्ञ संचालक भारत चंदनकर, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.