विठ्ठलवाडीचे समस्त गुंड घराणे म्हणजे गुणवत्ता व संस्काराची खाण – अध्यक्ष रामचंद्र भांगे
आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड व मेघश्री गुंड या बापलेकीचा सत्कार
माढा (बारामती झटका)
माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीच्या शिक्षण क्षेत्राचे आधारस्तंभ व मार्गदर्शक सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या परिवारातील दुसऱ्या पिढीतील आठ मुले शिक्षक झाली असून तिसऱ्या पिढीतील एक इंजिनिअर, एक शिक्षक व एकजण वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. यावरुन एक बाब लक्षात येते की, हे समस्त गुंड घराणे म्हणजे गुणवत्ता व संस्काराची खाण आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे यांनी केले आहे.
ते विठ्ठलवाडी ता. माढा, येथे महाराष्ट्र राज्य कृती समितीचा कृतीशील शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र बाळू गुंड यांचा व बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मेघश्री राजेंद्र गुंड या गुणवंत बापलेकीचा सत्कार करताना ते बोलत होते.
यावेळी श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे यांनी सांगितले की, जे लोक सत्कर्म करून ध्येयाच्या दिशेने प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ते हमखास यशस्वी होतात. हाच प्रत्यय या बापलेकीच्या कर्तृत्वातून दिसून येतो. जे लोक नेहमी प्रयत्नशील राहून सकारात्मक विचार करुन चांगल्या विचारी लोकांच्या सानिध्यात राहतात ते समाजात स्वतःचा वेगळा आदर्श निर्माण करतात. समस्त गुंड परिवारातील कष्टाळू व होतकरू गुणवंतांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, शांताबाई गुंड, मोहन भांगे, सुजाता भांगे, मेघना गुंड, सुवर्णा भांगे, शांता भांगे, सत्यवान शिंगाडे, दत्तात्रय काशीद, महेश भांगे, सार्थक भांगे, सक्षम भांगे यांच्यासह ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.