अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे मासिक मीटिंग वादळी ठरणार का ?

बाजार समितीच्या व्यापारी गाळे लिलावात पैशाचा अपहार चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी…
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी पणन संचालक यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे..
अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मासिक मीटिंग संपन्न होत आहे. राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी बाजार समितीच्या व्यापारी गाळे लिलावात पैशाचा अपहार झालेला आहे, त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा व संपूर्ण माहिती मिळावी यासाठी पणन संचालक यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची आज शुक्रवार दि. १८/०८/२०२३ रोजी मीटिंग वादळी ठरणार का ? याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.
राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी पणन संचालक यांना दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मी स्वतः अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्वाचित संचालक असताना व्यापारी गाळे लिलावाबाबत जाणीवपूर्वक माहिती दिली नाही. गाळ्यांच्या लिलावाबाबत संचालकांना निमंत्रित करणे व त्यांच्यासमोर त्या गाळ्यांचे लिलाव करणे बंधनकारक असताना कोणालाही निमंत्रित केले नाही. याचे कारण लिलावधारकांकडून १६ लाख रुपये घेऊन कागदोपत्री मात्र, ६ लाख रुपये दाखवले. अशाप्रकारे १२ व्यापारी गाळ्यांमध्ये १ कोटी २० लाख रुपयांचा अपहार झाला आहे. तरी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सभापती व सचिवांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. व १२ व्यापारी गाळ्यांचे आम्हा सर्व संचालकांसमोर फेर लीलाव करण्यात यावेत.


तसेच २०१९ पासून ते २०२३ पर्यंतची आर्थिक पत्रके मिळावीत, कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी, हंगामी कर्मचारी व कायमस्वरूपी कर्मचारी यांच्या मान्यतेच्या आदेशाची प्रत मिळावी, सर्व व्यापारी गाळे धारकांच्या करारपत्रांची प्रत मिळावी, २०१९ ते २०२३ या कालावधीमधील दोष दुरुस्ती अहवाल व त्याच्या केलेल्या पूर्ततेची कागदपत्रे मिळावीत, याबाबत माहिती मागितली असता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडून टाळाटाळ होत आहे, जाणीवपूर्वक माहिती दिली जात नाही. तरी या सर्व बाबतची माहिती तात्काळ देण्याचे आदेश अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना द्यावेत, असे या तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले आहे. सदर तक्रार अर्जाच्या प्रती जिल्हा उपनिबंधक (डी.डी.आर.) कार्यालय सोलापूर व सहाय्यक निबंधक कार्यालय, अकलूज यांना देण्यात आल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng