यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरु होणार

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत समितीचा निर्णय
मुंबई (बारामती झटका)
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या.
ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. यावर्षी उसाच्या लागवडीचे प्रमाण कमी आहे, ऊस तुटण्याच्या कालावधीनुसार उसाची रिकव्हरी कमी-जास्त होते. उसाच्या रिकव्हरीवर त्याचा दर ठरत असतो. दिवाळी सण, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा या सर्वांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. त्यानुसार त्यांनी १५ नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्यास होकार दर्शविला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.

यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर कारखाना संघाचे संचालक प्रकाश आवाडे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे आदी उपस्थित होते.
उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या खांडसरी, गूळ उत्पादन यांना नोंदणी व परवाने अनुषंगाने मागणीबाबत चर्चा करण्यात आली. खांडसरी उद्योगांना मान्यता व उत्पादन परवाना देण्याबाबतचे धोरण व गूळ उत्पादन प्रकल्पांना ऊस (नियंत्रण) आदेश, १९६६ लागू करण्याबाबत नियुक्त साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाचा अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले. यावेळी साखर उद्योगाशी संबंधित विविध विषयांबाबत चर्चा झाली.
रेक्टिफाईट स्पिरिट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल निर्मितीस परवानगी
केंद्र शासनाने इथेनॉल वर्ष २०२४-२५ मध्ये उसाचा रस, साखर सिरप, बी-हेवी, सी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मितीसाठी परवानगी दिली आहे. तसेच उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून रेक्टिफाईट स्पिरिट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. यानुसार राज्यात कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले. साखर उद्योगाशी संबंधित असलेल्या डिस्टिलरी प्रकल्पांमधील रेक्टिफाईड स्पिरिट व ईएनए अल्कोहोलवरील शुल्काबाबतदेखील यावेळी चर्चा करण्यात आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा