ताज्या बातम्याशहर

अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवीची यात्रा उत्साहात साजरी

अकलूज (बारामती झटका)

अकलूज व पंचक्रोशीतील ग्रामदैवत श्री अकलाई देवीची यात्रा भंडारा उत्साहात साजरा करण्यात आला. कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या नियोजनाखाली यात्रेचे नियोजन करण्यात येऊन श्री अकलाई देवीची पहाटेचा अभिषेक व पूजा ट्रस्टी विशाल नारायण फुले यांनी सपत्नीक केली. यावेळी श्री देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधण्यात आली होती. मंदिराचे पुजारी नंदू गुरव, मोहन गुरव, मदन गुरव यांनी अलंकार पूजा बांधली. यावेळी मंदिर समितीचे सचिव बाळासाहेब सणस, तुकाराम टिंगरे, राजाभाऊ लव्हाळे, लक्ष्मण आसबे, चंद्रकांत काळे आदी उपस्थित होते.

दुपारी बारा वाजता फुले वाड्यातून श्री अकलाई देवीची पालखी मंदिरात आणण्यात आली. तदनंतर मंदिर ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी जयसिंह मोहिते पाटील व सौभाग्यवती सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. यावेळी मोहिते पाटील कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. पूजेनंतर मंदिर समिती ट्रस्टच्या वतीने उभयतांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी पालखीचे स्वागत मंदिर समितीच्या वतीने करण्यात येऊन पालखी मंदिरामध्ये विराजमान झाली. आज दिवसभरात लाखो भाविकांनी श्री अकलाई देवीचे दर्शन घेतले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सौ. शितलदेवी मोहिते पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी श्री अकलाई देवीचे दर्शन घेतले.

देवीच्या पालखीचा छबिना मिरवणूक काढल्यानंतर सायंकाळी मंदिरासमोर असलेल्या दीपमाळा प्रज्वलित करण्यात आल्या. ‘आई राजा उदो उदो’, ‘श्री अकलाई देवीचे चांगभलं’, या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना रांगेतून दर्शन दिले जाते व प्रत्येकाला प्रसादाचे वाटप केले जाते. अकलूजमधील सर्व नवरात्र मंडळ, गणेश मंडळ यांचे कार्यकर्ते तसेच जैन समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज यांच्यावतीने ही सेवा बजावली जाते. अकलूज नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे तसेच अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड साहेब यांनी यात्रेचा बंदोबस्त चोख ठेवला होता. अकलूजमधील वॉटर फिल्टर पाणीपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी दिवसभर मोफत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. बुधवारी दुपारी श्री अकलाई देवीच्या पालखीचा छबिना मिरवणूक काढण्यात येऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button