Uncategorizedताज्या बातम्या

अकलूजमध्ये ४ फेब्रुवारीला मूकनायक ते प्रबुध्द भारतचा जागर!

भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

अकलूज (बारामती झटका)

पाक्षिक मूकनायक या वृत्तपत्राच्या १०२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने अकलूज येथील अन्नपूर्णा सांस्कृतिक भवन येथे मूकनायक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रध्देय भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मूकनायक ते प्रबुध्द भारतचा जागर होणार आहे. तरी या परिसंवादास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मूकनायक परिसंवाद कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित, पीडितांच्या व्यथा व असह्य वेदनांना वाचा फोडण्यासाठी पाक्षिक मूकनायकच्या माध्यमातून समाजप्रबोधनात्मक विद्रोही पत्रकारितेचा वसा हाती घेतला. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचा आवाज बुलंद केला. त्यामुळे शोषितांमध्ये जागृती होऊन अन्यायाविरूध्द संघर्ष करण्याचे बळ त्यांच्यात आले. मूकनायकमुळे समतावादी विचारांची पेरणी झाली, मुक्यांच्या वेदनांना हुंकार प्राप्त झाला व जातीअंताच्या नव्या पर्वाचा उदय झाला. मूकनायकमुळेच समाज प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल करू लागला. प्रत्येक विषयाची समीक्षा करू लागला. मूकनायकमुळे अस्पृश्य, बहिष्कृत समाजाला नवी उमेद मिळाली, स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मंत्र प्राप्त झाला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या प्रखर पत्रकारितेची व मूकनायक या आंबेडकरी चळवळीच्या प्रभावी मुखपत्राचे समाज उन्नतीसाठीच्या योगदानाची जाण ठेवून मूकनायक या वृत्तपत्रास दि. ३१ जानेवारी रोजी १०२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त व दि. ४ फेब्रुवारीला जनता या वृत्तपत्राचे प्रबुध्द भारत असे नामकरण केल्याचे औचित्य साधून दि. ४ फेब्रुवारी रोजी अकलूजमधील पत्रकार नागेश लोंढे, बाळासाहेब गायकवाड, सागर खरात, आनंद लोंढे, डी. एस. गायकवाड, गौतम भंडारे, कैलास कांबळे व सुजित सातपुते या पत्रकारांनी अकलूज येथील अन्नपूर्णा सांस्कृतिक भवनमध्ये मूकनायक परिसंवादाचे आयोजन केले आहे.

या परिसंवादास श्रध्देय भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते मूकनायक ते प्रबुध्द भारतचा प्रवास या परिसंवादात मांडणार आहेत. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त तथा बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्र चव्हाण हे महारांचा लष्करी व सांस्कृतिक इतिहास आणि समग्र भीमा कोरेगांव संग्राम या विषयांवर बोलणार आहेत. डॉ. सत्येंद्र चव्हाण यांचा छत्रपती संभाजीराजे यांच्यावर प्रचंड अभ्यास असून ते त्यांच्या सत्य घटनेवर लवकरच चित्रपटही काढणार आहेत. यावेळी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अकलूजचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच तत्पूर्वी विजय सरतापे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पहावयास मिळणार असून या कार्यक्रमस्थळी वैचारिक पुस्तकांच्या विक्रीचा स्टॉलही लावण्यात येणार आहे. तरी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील पत्रकार व विचारवंतांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मूकनायक कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button