आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आझाद मैदानावरील मराठा वनवास यात्रेस भेट दिली..

मुंबई (बारामती झटका)
मराठा वनवास यात्रेचे आझाद मैदानावर आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. सदर ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार तानाजीराव सावंत यांनी मराठा वनवास यात्रेला भेट दिली. आंदोलन कर्त्यांसोबत तेही चिखलात बसले. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण या सर्वसामान्य गोर गरीब मराठा समाजाच्या अधिकृत भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, हेही निक्षून आंदोलन कर्त्यांनी सांगितले. मंत्री महोदय नामदार तानाजीराव सावंत आले त्यांचे आभार; पण जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत माघार घेतली जाणार नाही. आंदोलन पुढे चालूच राहील.
सरकार सोबत बंद दाराआड चर्चेला जाणार नाही. ही गरीब मराठा समाजाची भूमिका देखील निष्ठेने मंत्री महोदयांना सांगितली. यापुढेही राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी सरकारमध्ये असलेले कायदेतज्ञ घेऊन आझाद मैदानावर यावे. जी काही चर्चा करायची ती मोकळ्या मैदानात. कॅमेरा समोर करू. समाजाला एकदा कळू तरी द्या. समाजाला ओबीसी आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय आहेत ?, आम्ही ओबीसी मधून आरक्षण कसे देता येईल याचा संविधानाला अनुसरून न्यायालयांच्या केसेस देखील दाखवत पटवून देऊ.
ना. तानाजीराव सावंत साहेबांनी देखील आपल्याला शब्द दिला की, मी मुख्यमंत्री महोदयांना याबाबत बोलतो. त्यांना येण्यासाठी आग्रह देखील धरतो, असे ते म्हणाले. पुढे बोलताना तानाजीराव सावंत सर म्हणाले की, मराठ्यांना कायद्यात बसणारे आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी मी स्वतः अनेकदा आक्रमक भूमिका मांडली आहे. मराठा समाजाच्या पाठीमागे उभा राहिलो आहे. यापुढेही उभा राहीन.
तानाजीराव सावंत साहेबांचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी आझाद मैदानावर येण्याचे औदार्य दाखवले. राजकीय प्रगल्भता दाखवली. जे रक्त मराठ्यांकडे वळत नाही ते रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही. अशी ठासून भूमिका आपण घेतलेली होती. आज तानाजीराव सावंत सर मैदानात तरी आले त्यामुळे त्यांच्यात असलेला मराठ्यांचा अंश दिसला.
येत्या अधिवेशनात मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत यावा. तसा कायदा मंजूर व्हावा ही माफक अपेक्षा समन्वयक यांनी व्यक्त केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng