Uncategorizedताज्या बातम्या

कमलाभवानी मंदिर चौक होणार मृत्यूचा सापळा

ग्रामस्थांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ठेकेदार अडचणीत, कमलाभवानी देवी ट्रस्टची भूमिका गुलदस्त्यात

करमाळा (बारामती झटका)

कमलाभवानी मंदिराच्या पायथ्याशी आगामी काळात मृत्यूचा सापळा होणार असून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध करून भावनिक प्रश्न निर्माण करून ठेकेदारांना अडचणीत आणण्याच्या भूमिकेमुळे या ठिकाणी रस्ता अरुंद होत असून देवीच्या माळावरील ग्रामस्थ व कमलाभवानी देवीचे ट्रस्टी स्पष्ट भूमिका घेत नसल्यामुळे कमलादेवी भक्तामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आगामी काळात खंडोबा माळ ते खालील लहान देवी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे प्राण जाणार आहे. याला भावी काळात जबाबदार राहणार कोण ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पंतप्रधान सडक योजनेतून कोर्टी ते सालसे या दोनशे कोटी रुपये रस्त्याचे काम सुरू आहे. कमलादेवीच्या पायथ्याशी असलेली छोटे मंदिर रस्त्याच्या एका बाजूला घेऊन रस्ता रुंद करणे मोठा करणे काळाची गरज आहे. चौकातून कमला भवानी शुगरची ऊस वाहतूक करणारी हजारो ट्रॅक्टर रोज जात असतात. गतवर्षी या चौकात किमान सतरा ते अठरा ट्रॅक्टर पलटी झाली होती. शिवाय करमाळा शहरातील महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड मोठी वर्दळ असते, या चौकात तिन्ही बाजूंनी येणारे रस्ते यु टर्न घेणारी असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर येथे अपघात होत असतात. देवीचा पायथा ते खंडोबा मंदिर हा रस्ता अंदाजपत्रकापेक्षा कमी रुंदीचा केलेला आहे. या रस्त्यावर प्रचंड तीव्र उतार आहे व या रस्त्यानेच लाखो भाविक देवीच्या दर्शनाला जात असतात. अनेकजण आपल्या स्वार्थासाठी या रस्त्याला विरोध करत असल्यामुळे ठेकेदार हतबल झाला आहे.

या रस्त्यावर पुढील परिणाम पाहता मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे जीव जाणार आहे हे निश्चित

कोंडीबा उबाळे – अभियंता बांधकाम विभाग
देवीचा माळ पायथा ते खंडोबा मंदिर हा रस्ता अरुंद झाला आहे. काही ठराविक लोकांनी विरोध केल्यानंतर ठेकेदारांनी अशा पद्धतीने रस्ता केला आहे. पायथ्याला असलेले देवीचे मंदिर एका बाजूला घेतले तर रस्ता अजून मोठा होऊ शकतो. पण काही नागरिक विरोध करीत असल्यामुळे आम्हाला हा निर्णय घेता येत नाही. व कमलादेवी ट्रस्टच्या लोकांनी व गावकऱ्यांनी एकत्रित निर्णय घेतला तर या रस्त्याची रुंदी अजून वाढू शकते व अपघाताची शक्यता कमी होऊ शकते.

सचिन शिंदे – ग्रामपंचायत सदस्य देवीचा माळ

देवीचा माळ ते खंडोबा माळ हा रस्ता प्रचंड केला आहे. ठराविक लोकांच्या स्वार्थासाठी हा रस्ता रुंद केला असून यामुळे देवीचा माळ हा मृत्यूचा सापळा होणार आहे. हा रस्ता करमाळा शहरापासून जेवढ्या रुंदीचा आहे, तेवढीच रुंदी देवीचा माळ पायथा ते खंडोबा मंदिर ठेवावी. मी बांधकाम खात्याला पत्र दिले आहे. खात्याचे अधिकारी राजकीय दबाव पोटी बेकायदेशीर काम करत आहेत.

अनिल पाटील – सचिव, कमला भवानी देवी ट्रस्ट

सर्व नियम धाब्यावर बसून हा रस्ता अरुंद करण्यात आला आहे. पायथ्याशी असलेले लहान देवीचे मंदिर बाजूला घेऊन रस्ता करमाळा शहरातील रुंदीप्रमाणे मोठा करावा. अन्यथा प्रचंड अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागणार आहे. भवानी देवी ट्रस्टचा सुद्धा या बेकायदेशीर कामाला विरोध आहे.

महेश चिवटे – जिल्हाप्रमुख शिवसेना

राजकीय दबावापोटी व काही लोकांच्या स्वार्थासाठी हा रस्ता अरुंद करण्यात आला असून पायथ्याच्या चौकात रुंदी अत्यंत कमी आहे. या चौकातून कमलाई कारखान्याची ऊस वाहतूक यु टर्न करून होते. यामुळे शेकडो अपघात होतात. हा रस्ता आत्ताच अंदाजपत्रकाप्रमाणे न केल्यास आगामी काळात अनेक लोकांचे निष्पाप जीव जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते व या कामाचा ठेकेदार तापडिया यांनी तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी नाहीतर शिवसेना या प्रश्न आंदोलन करेल. याबाबत तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी लक्ष घालावे व अशा लोकांना पाठीशी घालू नये, अशी मागणी कमला भवानी भाविकामधून होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button