गोरडवाडी गावचे बिनविरोध सरपंच विजयराव गोरड यांचा सरपंच पदाचा तडकाफडकी राजीनामा….
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच विजयराव निवृत्ती गोरड यांनी सरपंच पदाचा तडकाफडकी राजीनामा माळशिरस पंचायत समिती मधील सहाय्यक प्रशासन अधिकारी बी. एच. कदम व सहाय्यक श्री. एस. टी. खडतरे यांच्याकडे दिलेला आहे. यावेळी सरपंच विजयराव गोरड, माजी सरपंच बाळू गोरड सर, युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, माणिक कोकरे, गोरडवाडी गावचे पोलीस पाटील नाना यमगर पाटील, ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार आदी उपस्थित होते.
गोरडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील सर्व गट तट पक्षभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन गोरडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध केलेली होती. त्यावेळेस सरपंच व उपसरपंच पदाचा कालावधी व पदास योग्य असणाऱ्या सदस्यांची नावे गावातील वयोवृद्ध व ज्येष्ठ मंडळी यांनी ठरवलेली होती. त्यामध्ये बाळू गोरड सर व युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा कालावधी संपल्यानंतर विजयराव गोरड यांना सरपंच पदाची संधी मिळालेली होती. ठरल्याप्रमाणे विजयराव गोरड यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर नूतन सरपंच यांची निवड केली जाणार आहे.
गोरडवाडी ग्रामपंचायत पूर्वी इस्लामपूर व गोरडवाडी संयुक्त ग्रामपंचायत होती. स्वतंत्र गोरडवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा बिनविरोध सरपंच होण्याचा बहुमान स्वर्गीय निवृत्तीदादा गोरड यांना मिळालेला होता. त्यांच्या पक्षामध्ये त्यांचे चिरंजीव विजयराव गोरड यांना 40 वर्षानंतर बिनविरोध सरपंच पदाचा बहुमान मिळालेला होता. विजयराव गोरड यांनी सरपंच पदाच्या कारकिर्दीमध्ये गावातील अनेक विकासकामे पूर्ण केली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. अचानक राजीनामा दिलेला असल्याने तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. परंतु ठरल्याप्रमाणे राजीनामा देणारे गोरडवाडी ग्रामपंचायतमधील पदाधिकारी यांनी राजीनामा देऊन ग्रामदैवत बिरोबा देवाचे खऱ्या अर्थाने भक्त असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे सुरू आहे. तालुक्यामध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी सत्ता संघर्ष सुरू आहे. ठरल्याप्रमाणे सरपंच व उपसरपंच राजीनामा तालुक्यामध्ये देत नाहीत. मात्र, गोरडवाडी गावचा आदर्श तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांनी घेण्यासारखा आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng