ताज्या बातम्यासामाजिक

डाॅ. प्रेमनाथ रामदासी यांच्या कथासंग्रहाला कुंडल-कृष्णाई साहित्य पुरस्कार प्रदान

सातारा (बारामती झटका)

येथील प्रतिभावान साहित्यिक डाॅ. प्रेमनाथ रामदासी यांच्या ‘फ्युचर मॅन’ या विज्ञान कथासंग्रहास सातारा येथील कुंडल-कृष्णाई प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा येथील कूपर काॅलनी सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. राजेंद्र माने, ह.भ.प. सुहास महाराज फडतरे, पुण्याच्या उपजिल्हाधिकारी दीप्ती सूर्यवंशी, प्रा. निरंजन फरांदे आदी उपस्थित होते.

आम्ही पुस्तकांचे देणे लागतो, हे ब्रीदवाक्य समोर ठेवून कार्य करणारे कुंडल-कृष्णाई प्रतिष्ठान ही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील प्रसिद्ध संस्था आहे. माजी पोलिस उपअधिक्षक हणमंतराव जगदाळे व बालसाहित्यिका सावित्री जगदाळे हे दांपत्य ही संस्था चालवतात. संस्थेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतींना कुंडल-कृष्णाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२२ सालातील पुरस्कारांसाठी डाॅ. प्रेमनाथ रामदासी यांच्या फ्युचर मॅन या विज्ञान कथासंग्रहाची निवड तज्ज्ञांच्या समितीने केली. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व ग्रंथसंपदा असे या पुरस्काराचे स्वरुप होते. डाॅ. रामदासी यांचे यापूर्वी दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लहान मुलांसाठी कथा व बालनाट्यांचेही लेखन केले आहे. मराठी कवितांवरील जागतिकीकरणाच्या प्रभावाचा अभ्यास या विषयावर त्यांनी सादर केलेल्या महाप्रबंधास सोलापूर विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. डाॅ. प्रेमनाथ रामदासी हे सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी नं. १ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button