Uncategorizedताज्या बातम्या

पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग सर्वे करण्याचे रेल्वेमंत्र्यांनी दिले आदेश

लोणंद-फलटण रेल्वे मार्ग पूर्ण झाला, डेमु रेल्वे फलटण – पुणे चालू

फलटण (बारामती झटका)

पंढरपूर-फलटण मार्गाचे सर्वे करण्याचे आदेश निघाले आहेत. रेल्वेमंत्री खा. अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून या मार्गाचा सर्वे आता लवकरच होणार आहे. पंढरपूर-लोणंद हा मार्ग सुरू होण्याची शक्यता तयार झाली आहे. यामुळे पंढरपूर-पुणे-मुंबई हा रेल्वे मार्ग सुकर होणार आहे अशी माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बारामती झटक्याशी बोलताना दिली.

ब्रिटिश काळामध्ये या पंढरपूर लोणंद मार्गाचे सर्वेक्षण झाले होते. काही ठिकाणी तर रेल्वेने जमिनीही आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, तशी नोंद अनेक जमिनीवर आपणाला पहावयास मिळत आहे. मात्र अनेक कारणांमुळे या मार्गाचे काम रखडले आहे. अनेक खासदारांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे. मात्र, या मार्गाला अद्यापही कोणताही मुहूर्त लागला नाही. देशभरातील अनेक रेल्वे प्रकल्प सुरू होऊन ते पूर्णत्वालाही गेले मात्र, हा मार्ग मागे पडला आहे. तो केव्हा पूर्ण होईल ते कोणीही सांगू शकत नाही.
काही काळापूर्वी पंढरपुरातून लातूर मिरज या मार्गावर बार्शी लाईट रेल्वेची लहान गाडी धावत होती‌. या गाडीला वारकरी प्रेमाने विठूवाडी असे म्हणत असत. कारण, ही गाडी नॅरोगेज होती. या गाडीला प्रवास करण्यासाठी फार वेळ लागत असे. या गाडीने प्रवास करणारा प्रवासी हा आपल्या म्हशीची धार काढून या गाडीत चढू शकतो, असे विनोदाने म्हटले जात होते. एवढी ही गाडी हळूहळू चालत होती. या गाडीला ब्रॉडगेज मध्ये रूपांतरित करण्यासाठी पंढरपुरामध्ये मोठे आंदोलन झाले. या प्रश्नावर खा. रामभाऊ म्हाळगी यांनी लक्ष घातले. तसेच तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनीही ही गाडी ब्रॉडगेज होण्यासाठी लक्ष घातले होते. या सर्वांच्या प्रयत्नामुळे बार्शी लाईट रेल्वे ही ब्रॉडगेज होऊ शकली आणि वारकरी भाविकांची सोय झाली. मात्र पंढरपूर-लोणंद हा सर्वात जुना मार्ग अद्यापही रखडलाच आहे.

पंढरपूर-लोणंद हा मार्ग जर झाला तर पुणे आणि मुंबईला जाण्यासाठीचा वेळ वाचणार आहे. तसेच कुर्डूवाडीवरून जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. आताही फलटण पर्यंतचा मार्ग बांधून तयार आहे. या मार्गावर वाहतूकही सुरू आहे. जर फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाची लवकरात लवकर बांधणी झाली तर खा. निंबाळकरांचे फार मोठे यश असेल.

फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचे आता लवकर सुरू होणार असल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. फलटण लोणंद संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते एडवोकेट सोमनाथ वाघमोडे व इतर मान्यवर लवकरच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भेटीला जाणार आहेत.

मार्गावरील ३२७ हेक्टर जमिनीचे संपादन
पंढरपूर ते फलटण या रेल्वे मार्गाचे अनेक वेळा सर्वे झाले आहेत. या मार्गावरील ३२७ हेक्टर जमिनीचेही संपादन पूर्वीच्या काळात झाले आहे. जरी जमिनी आज शेतकरी कसत असले तरी उतारावर रेल्वेचे नाव आहे. यामुळे भूसंपादन हा विषय या मार्गाबाबत तरी असणारा नाही एकूण १४५ किलोमीटर अंतर असलेल्या या रेल्वे मार्गापैकी फलटण ते लोणंद या ४९ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आता केवळ १०५ किलोमीटरचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या मार्गावर वाखरी, वेळापूर, माळशिरस* नातेपुते, फलटण व लोणंद ही स्थानके अपेक्षित आहेत. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला तर या भागात मोठ्या संख्येने असलेले साखर कारखाने तसेच बागायती क्षेत्र, द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून पंढरपूर ते मुंबई हा मार्ग सध्या दौंड मार्गे जातो. मात्र, या प्रस्तावित मार्गामुळे हे अंतर कमी होणार असून त्यामुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना तसेच व्यापारी व विद्यार्थी यांना मोठा पर्यायी मार्ग ठरणार आहे. या रेल्वे मार्गामुळे सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यापूर्वी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील व माजी खासदार व आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी या मार्गासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळेस सर्वे करण्यासाठी १०० कोटींची मंजुरी देखील मिळाली होती. मात्र हे काम पुढे सरकले नाही. आता तरी केवळ घोषणा न होता, या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणे गरजेचे आहे. त्यासाठी खा. रणजितसिंह निंबाळकर यांना त्यांच्या प्रयत्नांना राज्य सरकार व अन्य नेत्यांनी मदत करणे गरजेचे आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button