Uncategorized

बहुजनांच्या विकासासाठी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान महत्त्वाचे – केंद्रप्रमुख रोहिदास कापसे

श्री संत गाडगेबाबा विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा

माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड यांजकडून

फुले-शाहू-आंबेडकरांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य तसेच त्यांची विचारधारा देशाला लाभली हे सर्वांचे भाग्यच आहे. विशेषत: छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी जे महान कार्य‌ केले ते अविस्मरणीय व अजरामर आहे. त्यांनी शाळा व कॉलेजेस, वसतीगृहे, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे प्रयत्न केले म्हणूनच त्यांची ओळख एक लोककल्याणकारी राजा असल्याचे प्रतिपादन मानेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी केले आहे.

ते आनंदनगर-मानेगाव, ता. माढा, येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रप्रमुख रोहिदास कापसे व मुख्याध्यापक प्रवीण लटके यांच्याहस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक सहशिक्षक सुनील खोत यांनी केले.

पुढे बोलताना केंद्रप्रमुख रोहिदास कापसे यांनी सांगितले की, श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता उत्कृष्ट आहे. या विद्यालयात शालेय व सहशालेय उपक्रम सातत्याने राबविले जातात. येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती‌ व एटीएस आणि 10 वी बोर्डाच्या परीक्षेत सातत्याने उज्ज्वल यश संपादित केले आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी येथील सर्व शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. हे विद्यालय विविध उपक्रमांच्या व गुणवत्तेच्या माध्यमातून नावारूपाला आले आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी लोकांची पहिली पसंती या विद्यालयास आहे. येथील शिक्षक कृतियुक्त पद्धतीने अध्यापन करतात. त्यामुळे अनेक गुणवंत व अष्टपैलू विद्यार्थी घडले आहेत. हीच यशस्वी परंपरा सुरू ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेली कल्याणी जगताप व इतर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इ. ९ वीत प्रथम क्रमांक पटकावलेली विद्यार्थ्यीनी हर्षदा पालेकर हिने मनोगत व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापक प्रविण लटके, तुकाराम कापसे, शिवाजी भोगे, महेश नागटिळक, तनुजा तांबोळी, सचिन क्षीरसागर, सुनील खोत, सुधीर टोणगे, लहू गवळी, सागर राजगुरू यांच्यासह प्रशालेतील ५ वी ते १० वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button