भीमा कोरेगांवची जागा घालविण्यासाठीच इंदिरा अस्वारकडून वादग्रस्त जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती.

आपल्या अस्मिता घालविल्यानंतर आंबेडकरी समाज जागा होणार का?
पुणे (बारामती झटका)
भीमा कोरेगांव येथे आंतरराष्ट्रीय युध्दस्मारक उभारण्यासाठी बार्टीकडून पाठपुरावा सुरू असतानाच निबंधक इंदिरा अस्वार यांनी भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाच्या जागेची केस कमजोर करण्यासाठी सनद रद्द झालेल्या वादग्रस्त निलंबित जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे जागृत आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून इंदिरा अस्वार यांनी आपल्या अस्मिता घालविल्यानंतर आंबेडकरी समाज जागा होणार का? असा प्रश्न भीमसैनिकांतून उपस्थित होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ही एससी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असणारी महाराष्ट्र शासनाची एकमेव स्वायत्त संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून एससी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्याठिकाणी आरएसएसची विचारधारा रुजविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. आंबेडकरी चळवळीला सक्षम करणारी ही संस्था संपविण्याचे हे एक भयानक षडयंत्र आहे. निबंधक इंदिरा अस्वार यांनी जाणीवपूर्वक जातीयवादी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना महत्वाचे विभाग देऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना त्या वारंवार त्रास देताना दिसत आहेत. मागील दीड वर्षांतच निबंधक इंदिरा अस्वार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बार्टीला संपविण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच आता समस्त आंबेडकरी समाजाची अस्मिता असलेल्या भीमा कोरेगावची जागा घालविण्याचे मोठे षडयंत्र सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केलेल्या हेमंत अहिवळे यांच्यावर काही विनयभंगाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांची सनद रद्द झाल्याची चर्चा असून कुठलीही निविदा न काढता इंदिरा अस्वार यांनी त्यांची ४८ हजार रुपये पगारावर थेट नियुक्ती केल्याचे समजते. त्यांचा हा सगळा अट्टाहास कशासाठी आहे? हे काही लपून राहिलेले नाही. वास्तविक पाहता पूर्वी प्रियदर्शी तेलंग हे विधी सल्लागार म्हणून केवळ २५ हजार रूपये पगारावर कार्यरत होते. मात्र तत्कालीन महासंचालकांनी जेव्हा त्यांच्या ४० हजार रुपये पगाराचा प्रस्ताव तयार केला तेव्हा तो प्रस्ताव जाणीवपूर्वक दाबून ठेवण्यात आल्याने गलिच्छ कुरघोड्यांना वैतागून तेलंग काम सोडून निघून गेले. त्यामुळे रिक्त झालेल्या विधी सल्लागारपदी कसलीही जाहिरात न काढता थेट ४८ हजार रूपये पगार देऊन इंदिरा अस्वार यांनी हेमंत अहिवळे यांची नियुक्ती केली. तर सहायक विधी अधिकारी म्हणून बनकर यांची नियुक्ती केली आहे. प्रियदर्शी तेलंग हे आंतरराष्ट्रीय विधी सल्लागार असतानाही त्यांच्यासारख्या अभ्यासू वकिलांच्या पगारवाढीचा प्रस्ताव जाणीवपूर्वक दाबून ठेवला. मात्र ज्यांच्यावर विनयभंगाच्या केसेस असल्याची चर्चा आहे अशा सनद रद्द झालेल्या जिल्हा न्यायाधीशांची इंदिरा अस्वार यांनी नियुक्ती केलेली आहे. तर भीमा कोरेगाव रणस्तंभाच्या फाईलवर कसलेही काम न करणाऱ्या सहाय्यक विधी अधिकारी बनकर यांना तत्कालीन महासंचालकांनी कार्यमुक्त केलेले असताना इंदिरा अस्वार यांनी त्यांची फेरनियुक्ती केलेली आहे. मग कार्यमुक्त केलेल्या धनश्री अवचरे व बनकर यांच्याइतके समाजात कुणी हुशारच नाही का? एखादा गरजू कामासाठी गेला तर जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, ती निघाल्यावर बघू असे सांगितले जाते. मग आता या दोघांच्याही नियुक्त्या जाहिरातीशिवाय कशा केल्या? असा संतप्त प्रश्न विचारुन निबंधक इंदिरा अस्वार यांचेबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे. सदरच्या नियुक्तीनंतर अहिवळे व बनकर हे दोघेजण दररोज सर्वांच्या अगोदर ऑफिसमध्ये येऊन दरवाजा बंद करून भीमा कोरेगावची केस कमजोर करण्यासाठी काम करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बनकर यांना यापूर्वीही इंदिरा अस्वार यांनी नियुक्त केले होते. तथापि त्यांची कार्यपद्धती पाहता तत्कालीन महासंचालकांनी धारेवर धरणे सुरू केल्याने त्याने कोर्टात वकिली करायची आहे या सबबीखाली पळ काढला.
आता इंदिरा अस्वार यांनी पुन्हा त्यांना नियुक्त करून भीमा कोरेगाव प्रकरणात बौद्धांच्या विरोधात निर्णय लावण्याची पूर्ण तयारी केली आहे. दरम्यान ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असल्याने या संस्थेशी सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जोपासून अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत. मात्र इंदिरा अस्वार यांच्या विशिष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्याच्या भूमिकेमुळे हे कार्यकर्ते भरडले जात आहेत. वेगवेगळी आमिषे दाखवून अस्वार यांनी अनेक कार्यकर्ते व कर्मचारी फोडले. पण जे आंबेडकरी तत्वाशी बांधिलकी जोपासणारे आहेत ते बार्टीला वाचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहेत. मात्र धनलक्ष्मीच्या आशिर्वादामुळे मंत्रालयातील आपलेच अधिकारी त्यांची पाठराखण करीत असल्याने आपले घर जळत असतानाही पैशाच्या मोहापायी ते फिडेल वाजविणारे निरो झालेले दिसत आहेत. त्यामुळे त्यांचाही आम्ही वेळीच बंदोबस्त करूच! पण आता भीमा कोरेगावच्या शौर्यस्तंभाची जागा घालविण्यासाठी निबंधक इंदिरा अस्वार यांनी रचलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी सर्व आंबेडकरी भीमसैनिकांनी सज्ज व्हावे आणि निबंधक इंदिरा अस्वार, विधी सल्लागार हेमंत अहिवळे व उपसल्लागार बनकर यांना बार्टीतून कार्यमुक्त करण्यासाठी जोर लावावा असे आंबेडकरी समाजातून बोलले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng