सतीशभाऊ सावंत यांना आदर्श फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार जाहीर
सांगोला (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील निर्भिड संपादक सतीशभाऊ सावंत यांना इस्लामपूरच्या आदर्श फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार यांनी जाहीर केला असून लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
सतीशभाऊ सावंत हे गेली 26 वर्षांपासून तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात पत्रकारिता करीत आहेत. सर्व सामान्यांच्या प्रश्नावर ते सतत निष्पक्षपातीपणे वाचा फोडतात. त्यांनी निर्भीडपणे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहेत. सतीशभाऊ सावंत यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्टपणे काम पाहिले आहे. जिल्ह्यात पत्रकारांचे मोठे संघटन केले आहे. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर दोन दैनिके अतिशय पारदर्शकपणे चालवून आदर्श निर्माण केला आहे. नवोदित पत्रकार त्यांनी तयार केले आहेत. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. सांगोला तालुक्यासह जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आपला वचक ठेवला आहे. निरपेक्ष भावनेने जनतेचे अहोरात्र प्रश्न ते सोडवितात.
आदर्श फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूर येथे राज्यातील मंत्री महोदयांच्या व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. आदर्श फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कोल्हापूर येथील समाज गुणगौरव संमेलन आयोजित करण्यात येत असून विविध क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना संमेलनात या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्कार समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सतीश भाऊ सावंत यांचे कार्य हे निश्चितच दैदीप्यमान व गौरवपूर्ण आहे आणि म्हणूनच सतीशभाऊ सावंत यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
त्यांच्या पुढील भाविक कार्यास स्फूर्ती व प्रोत्साहन देण्यासाठी सतीशभाऊ सावंत यांना पुरस्कार प्रदान करून गौरव करण्याचा आदर्श फाउंडेशनचा मनोदय आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान हे निमित्त मात्र असते. व त्या सन्मानामागील भावना प्रगतीला स्फूर्ती व बळ देतात म्हणून पुरस्कार हे यथोचित असतात. पुरस्कारापेक्षा आपले कार्य मोठे आहे. भविष्यातील आपल्या वैभवशाली वाटचालीस शुभेच्छा असे निवडीच्या पत्रकात नमूद केले आहे. सतीशभाऊ सावंत यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng