सदाशिवनगर-पुरंदावडे गावातील उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त होऊन गावाचे अस्तीत्व धोक्यात येवून संपण्याच्या मार्गावर…
देहू-आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाच्या उड्डाणपुलाला विरोध नसून, उड्डाणपूलाची रचना बदलण्याची नागरिक व व्यापारी शेतकऱ्यांची मागणी
सदाशिवनगर ( बारामती झटका)
देहू-आळंदी-पुणे-पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गाचे विस्तारीकरण होऊन महामार्गामध्ये रूपांतर करण्यात आले आहे. महामार्ग विस्तारीकरण करीत असताना सदाशिवनगर पुरंदावडे गावातील उड्डाणपूलामुळे दोन्ही गावांतील उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त होऊन गावाचं अस्तीत्व धोक्यात येऊन संपण्याच्या मार्गावर आहे. देहू-आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर उड्डाणपूलला विरोध नाही, फक्त उड्डाणपूलाची रचना बदलावी अशी स्थानिक नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय यांनी मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्याच्या दोन्ही गावातील स्थानिक नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थिनी पवित्र्यात आहेत.

सदाशिवनगर पुरंदावडे या गावाला साखर कारखाना, शाळा, कॉलेज, शेती महामंडळ यामुळे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व आहे. या गावाला आसपासच्या गावातील लोकांचा दैनंदिन संबंध येत असतो. कारखान्याकडे ऊस घातलेले ऊस उत्पादक सभासद शेतकरी, शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी, स्थानिक नागरिक यांचा दैनंदिन व्यवहार व आसपासच्या गावातील व्यापाऱ्यांकडे खरेदी विक्रीसाठी आलेले शेतकरी व ग्राहक विक्रेते यांचा संबंध येत असतो. उड्डाण पुलामुळे गावाचे दोन भाग पडलेले आहेत. भिंतीसारखा उड्डाणपूल असल्याने अलीकडील माणूस पलीकडे जात नाही व पलीकडील माणूस अलीकडे येत नाही, अशी अडचण होणार आहे.

पालखी महामार्गाच्या लगतच पुरंदावडे हद्दीत माऊलींचा पहिला गोल रिंगण सोहळा संपन्न होत असतो. लाखो भाविक पालखी सोहळ्यासोबत असतात. स्थानिक नागरिक व आसपासच्या गावातील हजारो भाविकभक्त माऊलींच्या दर्शनासाठी व रिंगण सोहळा पाहण्यासाठी येत असतात. भाविकांची प्रचंड गर्दी असते. अशावेळी भिंतीचा उड्डाणपूल असल्यानंतर भाविकांना बाहेर पडताना अडचणी निर्माण होणार आहेत.
उड्डाणपूल जर भिंतीसारखा न तयार करता मोकळा बॅक्स पाईप काॅलममध्ये तयार केल्यास भाविकांची अडचण दूर होऊन स्थानिक नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची अडचण दूर होईल. आसपासच्या गावातील लोकांची सुध्दा उड्डाणपूल झाल्यामुळे अडचण दूर होईल. दोन्ही गावाचे अस्तीत्व धोक्यात येणार नाही, यासाठी दोन्ही गावातील स्थानिक नागरिक व व्यापारी यांनी उड्डाणपूलाची रचना बदलावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
