सावधान सरपंचांनो, भ्रष्टाचार व शासकीय निधीचा अपहार कराल तर जेलमध्ये जाल…
…अखेर तत्कालीन सरपंच दादा रणदिवे यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून अटक, ॲड. धैर्यशील रामदास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
फोंडशिरस ( बारामती झटका )
फोंडशिरस ता. माळशिरस येथील ॲड. धैर्यशील रामदास पाटील यांनी फोंडशिरस ग्रामपंचायतीमध्ये सरपंच दादा महादेव रणदिवे, ग्रामसेवक अशोक मुकुंद धाईंजे व ग्रामपंचायत क्लार्क विजय खाशाबा बोडरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडे तक्रार दिलेली होती. त्यावेळेस ग्रामसेवक व क्लार्क यांना अटक झालेली होती. मात्र, सरपंच दादा रणदिवे यांनी न्यायालयात धाव घेतलेली होती. माळशिरस येथील जिल्हा न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला होता. सरपंच दादा रणदिवे यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी दाद मागितलेली होती. मेहरबान न्यायालय यांनी अंतरिम जामीन मंजूर केलेला होता, कायम जामीन मंजूर केलेला नव्हता. सदरच्या जामीनाची मुदत संपताच अँटीकरप्शन विभागाने तत्कालीन सरपंच दादा रणदिवे यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केलेले आहे. त्यामुळे सर्वच सरपंचांनी सावधान रहावे, भ्रष्टाचार व शासकीय निधीचा अपहार कराल तर जेलमध्ये जाल, अशी या प्रकरणावरून परिस्थिती निर्माण झालेली आहे. ॲड. धैर्यशील पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे.
तक्रारदार ॲड. धैर्यशील पाटील यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जातील हकीगत अशी की, चौकशीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) जिल्हा परिषद, सोलापुर यांचेकडून ग्रामपंचायत फोंडशिरसमध्ये झालेल्या व्यवहाराबाबत विभागीय चौकशीचा अहवाल प्राप्त करून घेतला आहे. शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा फोंडशिरस यांचेकडुन ग्रामपंचायत फोंडशिरसच्या खाते क्रमांकाचे उतारे प्राप्त करुन घेतले आहेत, तसेच सदर खात्यामधून ग्रामपंचायत क्लार्क विजय बोडरे यांनी काढलेल्या रकमांचे चेकच्या सत्यप्रती व संबंधीत कागदपत्रे प्राप्त करून घेतली आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस यांचेकडुन, 1) अशोक मुकुंद धाईजे, ग्रामसेवक, 2) दादा महादेव रणदिवे, सरपंच, 3) विजय खाशाबा बोडरे, क्लार्क हे तिघेजण कोणत्या कालावधीत ग्रामपंचायत फोडशिरस येथे कार्यरत होते व ते लोकसेवक होते काय, याबाबत माहिती प्राप्त करून घेतली आहे.
गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस यांचेकडुन फोंडशिरस ग्रामपंचायत येथे 13 व्या वित्त आयोगानुसार झालेल्या कामकाजाबाबत व त्यातील तृटींबाबत नमुना नं. 5 सामान्य कॅशबुक, पाणीपुरवठा कॅशबुक, बँक पासबुके, व्हावचर फाईल 13 वा वित्त आयोग, व्हावचर फाईल पाणीपुरवठा निधी, व्हावचर फाईल सामान्य निधी इत्यादी बाबत माहिती प्राप्त करून घेतली आहे. मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सोलापुर गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस याचेकडुन आवश्यक ती कागदपत्रे प्राप्त करून घेतली आहेत. शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सह. बँक सोलापुर शाखा फोंडशिरस यांचेकडुन फोंडशिरस ग्रामपंचायतीच्या अकाउंटची आवश्यक ती माहिती व चेकच्या सत्यप्रती प्राप्त करून घेतल्या आहेत. सर्व जबाब व प्राप्त कागदपत्राचे अवलोकन केले, त्यावरून सदर प्रकरणात विस्तार अधिकारी श्री. खरात यांनी घेतलेल्या दफ्तर तपासणीमध्ये खालील नमुद मुद्याबाबत आक्षेप घेण्यात आले होते. 1. 13 वा वित्त आयोग निधी मधून सन 2015-16 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीने पूर्ण केलेल्या कामाची राॅयल्टीची रक्कम रुपये 1.80,657/- ही भरणा केली नाही व खात्यावर शिल्लक ठेवली नाही. यावरून गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस यांनी फोंडशिरस ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री. अशोक धाईजे व फोडशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. दादा रणदिवे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
तदनंतर ग्रामविकास अधिकारी श्री. अशोक धाईजे व फोंडशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. रणदिवे यांनी राॅयल्टी रक्कम रुपये 1,80,657/- दि. 07/03/2016 रोजी फक्त मुद्दल भरणा केलेली असून व्याजाची रक्कम भरणा केलेली नाही. 2. ग्रामपंचायतीचे क्लार्क श्री. पविजय खाशाबा बोडरे यांचे नावे ग्रामविकास अधिकारी श्री. अशोक मुकुंदा धाईजे व सरपंच श्री. दादा महादेव रणदिवे यांनी सन 2015 -16 या आर्थिक वर्षात रुपये 4,84,596/- इतकी रक्कम खर्ची घातलेली आहे. 3. ग्रामपंचायतीचे दप्तर महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 प्रमाणे ठेवण्यात आले नाही. 4. नमुना नं. 7. व नमुना नं. 10 ची पावती पुस्तके पंचायत समितीकडून प्रमाणीत करून घेतलेली नाहीत, 5. महिला ग्रामसभा घेतलेल्या नाहीत. 6. वर्गीकरण रजिस्टर ठेवलेले नाही. 7. साठा नोंदवही लिहिलेली नाही. वरील सात मुद्द्यांपैकी मुद्दा क्र. 1, 3, 4, 5, 6, व 7 हे प्रशासकिय मुददे असून, सदर बाबत गैरअर्जदार धाईंजे व रणदिवे यांची विभागीय चौकशी झालेली आहे. वरील पैकी मुद्दा क्र. 2 मध्ये शासकिय रकमेचा गैरव्यवहार करून शासकीय रकमेचा अपहार झाला असल्याचे दिसुन येत असल्याने सदर बाबत सविस्तर चौकशी करण्यात आली. त्यामध्ये गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस यांचेकडुन प्राप्त माहितीनुसार संबंधीत कालावधीमध्ये लोकसेवक म्हणुन अशोक धाईंजे (ग्रामसेवक), दादा रणदिवे (सरपंच), विजय बोडरे (क्लार्क) हे कार्यरत असल्याचे दिसुन येते. सदर कालावधीतील ग्रामपंचायत क्लार्क विजय बोडरे यांचे नावे काढण्यात आलेल्या बिलाबाबत सविस्तर माहिती प्राप्त करुन घेतली असता संबंधीत ग्रामनिधीमधील 1 ते 35 बाबींपैकी फक्त 20 प्रकरणामध्ये संबंधीत दुकानदाराच्या पावत्या जोडलेल्या आहेत. सदर जोडलेल्या पावती बाबत त्या पावत्या ज्या दुकानाच्या आहेत. त्याचे जबाब नोंदवले असता सर्व पावत्यांची रक्कम हि संबंधीत दुकानदाराला मिळालेली नसल्याचे जबाबावरून स्पष्ट होत आहे. तसेच संबंधित वस्तू खरेदी केल्याचे दिसून येत नाही. तसेच सदर पावत्यावरील सही, हस्ताक्षर तसेच मालाचे वर्णन हे संबंधीत दुकानदारांनी लिहले नसल्याचे निष्पन्न होत आहे. सदर खोटया व बनावट पावत्यावरून नमुना नं. 15 हे ग्रामसेवक धाईंजे व सरपंच रणदिवे यांनी तयार केल्याचे दिसुन येत आहे. सदर बनावट पावत्यावरून खोटी व्हाउचर बिले यातील ग्रामसेवक धाईंजे, सरपंच दादा रणदिवे व क्लार्क विजय बोडरे यांनी तयार केलेली आहेत. व सदर व्हाउचर वरती ग्रामसेवक धाईंजे, सरपंच रणदिवे व क्लार्क बोडरे यांनी सह्या केल्या आहेत. सदर व्हाउचर वरून यातील ग्रामसेवक व सरपंच ज्यांनी ग्रामपंचायत क्लार्क बोडरे यांचे नावे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा फोंडशिरस येथे बेअरर चेक देवुन सदरची रक्कम काढलेली दिसुन येत आहे.
सदर माहिती मधुन यातील ग्रामसेवक धाईंजे व सरपंच रणदीवे यांनी सन 2015 मध्ये ग्रामपंचायत क्लार्क विजय बोडरे यांचे नावावर ग्रामनिधी खात्यातून 4,73,496/-रु. व पाणीपुरवठा खात्यामधून 11.100/-रु. काढल्याचे स्पष्ट होत आहे. सदर बाबत संबंधीत कॅशबुकमध्ये ग्रामसेवक धाईंजे यांनी नोंद घेतलेली दिसुन येत आहे. तसेच प्रत्येक नोंदीनंतर ग्रामसेवक धाईंजे व सरपंच रणदिवे यांनी सह्या केल्याचे दिसून येत आहे. शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा फोंडशिरस यांचेकडुन प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत फोंडशिरसचे अकाउंटमधुन वर नमुद रकमा या ग्रामसेवक धाईंजे व सरपंच रणदीवे यांचे संयुक्त सहीने बेअरर चेकद्वारे फोंडशिरस ग्रामपंचायतचे क्लार्क विजय बोडरे यांनी काढल्याचे दिसुन येत आहे.
सदरच्या रकमा काढल्यानंतर सदर बाबत संबंधीत कॅशबुक मध्ये खोट्या नोंदी घेतल्याचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती, माळशिरस यांचेकडुन प्राप्त कागदपत्रावरुन दिसुन येत आहे. सदर प्रकरणाबाबत गैरअर्जदार धाईंजे व गैरअर्जदार रणदिवे यांची विभागीय चौकशी रश्मी खांडेकर, सहा. आयुक्त (चौकशी), विभागीय खातेनिहाय चौकशी, परिषद सेवक, पुणे विभाग, पुणे यांनी केलेली आहे. त्यामधे सदर व्यवहारात साशंकता निर्माण होत आहे. सदरच्या रकमा या ज्या त्या खातेदारांना क्रॉसचेकद्वारे देणे बंधनकारक व नियमानुसार उचीत ठरत असताना, ग्रामपंचायत क्लार्क विजय बोडरे यांचे नावे खर्ची घालून अनियमीतता असलेचे दिसुन येत आहे. सदर प्रकरणात संबंधीत एकूण 10 साक्षीदारांकडे चौकशी करुन जबाब नोंदवले असता, त्यापैकी व्यावसायीक दुकानदारांनी ज्याच्या पावत्या ग्रामसेवक धाईंजे, सरपंच रणदीवे, यांनी जोडलेल्या आहेत, त्यांनी सदरच्या पावत्यावरील रक्कम हस्ताक्षर अथवा मजकुर हे त्यांनी लिहिले नसल्याचे सांगीतले आहे. तसेच संबंधित वस्तू या ग्रामपंचायत फोंडशिरस यांचेकडून खरेदी केल्या नसल्याचे दिसून येत आहे. यावरुन ग्रामसेवक धाईंजे व सरपंच रणदीवे यांनी स्वतःचे फायद्यासाठी बनावट पावत्या तयार केल्याचे दिसुन येत आहे. यातील गैरअर्जदार तत्कालीन ग्रामसेवक अशोक मुकुंद धाईंजे, तत्कालीन सरपंच दादा महादेव राणदिवे व क्लार्क विजय खाशाबा बोडरे यांचे जबाब नोंदवले असता, तिन्ही गैरअर्जदार यांनी कोणत्याही मुद्दयांवर समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. एकंदरीत करण्यात आलेल्या उघड चौकशीवरुन ग्रामपंचायत फोंडशिरस मधील तत्कालीन ग्रामसेवक अशोक मुकुंद धाईंजे, तत्कालीन सरपंच दादा महादेव रणदिवे, व क्लार्क विजय खाशाबा बोडरे यांनी आपले लोकसेवक पदाचा तसेच त्यांना असलेल्या अधिकाराचा दुरूपयोग व गैरवापर करून दि.04.04.2015 ते दि.10.12.2015 या कालावधीत संगनमताने 13 व्या वित्त आयोगातील फोंडशिरस ग्रामपंचायतीतील ग्रामनिधीची रक्कम 4.73.496/-रु. व पाणीपुरवठा खात्यातून 11,100/-रु. अशी एकुण 4,84,596/-रु. रक्कम हि ग्रामसेवक धाईंजे व सरपंच रणदिवे यांनी स्वतःच्या अधिकारात क्लार्क बोडरे यांचे नावे चेकद्वारे काढुन सदरची रक्कम तिघांनी स्वतः करीता बेकायदेशीररीत्या मिळवून शासकीय रकमेचा अपहार केला असल्याचे दिसुन येत आहे. सदर रक्कम मिळवण्यासाठी ग्रामसेवक अशोक मुकुंद धाईंजे, सरपंच दादा महादेव रणदिवे व क्लार्क विजय खाशाबा बोडरे यांनी संगनमताने ग्रामपंचायत फोंडशिरस करीता आवश्यक असणाऱ्या संबंधीत वस्तु खरेदी न करता तसेच केलेल्या कामाच्या संबंधित बनावट पावत्या तयार केल्या. त्या बनावट पावत्या ख-या म्हणुन वापरून सदर पावतीवरून व्हाउचर बिल तयार केले व याबाबत खोट्या नोंदी ग्रामपंचायतीच्या कॅशबुक रजिस्टरमध्ये घेतल्या आहेत. म्हणुन नमुद तिघांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13 (1) (क), 13(2) तसेच भा.दं.वि.क. 465, 466, 467, 468, 471, 477, (अ) 34 प्रमाणे माझी सरकार तर्फे फिर्याद तक्रार त्यांनी दि. 24/02/2020 रोजी दिलेली होती.
ॲड. धैर्यशील पाटील यांनी चार वर्ष या प्रकरणाचा पाठपुरावा सातत्याने केलेला आहे. प्रत्येक गावात ॲड. धैर्यशील पाटील यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते व गावाच्या हिताचे सुज्ञ नागरिक तयार होतील, त्यावेळेला खऱ्या अर्थाने गावगाड्यामधील भ्रष्टाचार व शासकीय निधीचा अपहार थांबेल, असा एक प्रकारे फोंडशिरस ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या व अपहरणाच्या पाठपुराव्यावरून तालुक्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
तुम्हाला नातेपुते च्या जवळ कुठेतरी पाहिलं आहे गाडीवर होते तुम्ही एकटेच त्यावेळी मी पाहिलं बारामती झटका गाडीवर लिहलेले