Uncategorizedकृषिवार्ताताज्या बातम्या

स्वाभिमानीची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपुरात होणार – राजू शेट्टी

जयसिंगपूर (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे विक्रमसिंह क्रीडांगण मैदानावरती होणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. ते कोल्हापूर येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदमध्ये बोलत होते. तसेच “जागर एफआरपीचा, संघर्ष ऊस दराचा” यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ९ दिवस मोठ्या सभा घेणार असल्याची घोषणाही केली.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांचा विश्वासघात करून एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा करून शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय तातडीने रद्द करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी देखील केली आहे. त्यासंदर्भात शिंदे सरकारने अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

एकीकडे रासायनिक खतांचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. दुसरीकडे शेतकर्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच प्रमाणात एफआरपीमध्ये वाढ झालेली नाही. उलट केंद्र सरकारने एफआरपीचा बेस वाढवून १०.२५ टक्क्यांवर वाढवून शेतकर्यांचे मोठे नुकसान केले. एकरकमी एफआरपी हा शेतकर्यांना कायद्याने दिलेला हक्क आहे, असे असताना सरकारने एफआरपीचे दोन तुकडे करून ऊस उत्पादक शेतकर्यांच्या अन्नात माती कालवली आहे.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २४ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत ९ दिवस जागर यात्रा काढणार आहे. ही यात्रा सरूड, परिते, गडहिंग्लज, निपाणी, येडेमच्छिंद्र, कुंडल, घुणकी, कागल, दत्तवाड, चंदगड, कोडोली, वळीवडे व कांदे या ठिकाणी एफआरपी जागर यात्रा काढून शेतकर्यांमध्ये जनजागृती करणार आहे. ऊस दरासाठी संघर्ष अटळ आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २१ वी ऊस परिषद जयसिंगपुरात १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. एफआरपी दोन तुकड्याचा निर्णय राज्य सरकारने अगोदर रद्द करावा.

सरकारला अजून ४० दिवस अवधी आहे. जोपर्यंत एकरकमी एफआरपीचा निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. आम्ही कधीही रस्त्यावरील लढाईला तयार आहोत. जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगली मागणी आहे. बहुतेक देशात यंदा दुष्काळ आहे. भारतात शिल्लक साखर साठा नाही. याचा लाभ आपण उठवावा.

उसाचे क्षेत्र जादा असले तरी सर्व उसाचे गाळप करणे ही सरकारची सर्वस्वी जबाबदारी आहे. संघर्ष नको असेल तर तातडीने ऊस दरामध्ये राज्य सरकारने लक्ष घालून यावर निर्णय घ्यावा. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, वैभव कांबळे, जयकुमार कोले, पोपट मोरे, बाबासाहेब सांद्रे, आण्णासो चौगुले, सागर शंभुशेटे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button