महाळुंगमधील लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक खतपाणी घालत आहेत महिलांची संतप्त भूमिका…

महाळुंग नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्र. ६ मधील नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
महाळुंग (बारामती झटका)
महाळुंग-श्रीपुर नगरपंचायत हद्दीतून जाणाऱ्या यमाई देवी मंदिरा पाठीमागे संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या पुलालगत असलेली साईड गटार पूर्वत करून घेण्यासाठी वार्ड क्रमांक ६ मधील नागरिकांनी मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले आहे. सदरचे निवेदन नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोक चव्हाण यांनी स्वीकारले आहे.
सदर निवेदनात असे म्हटले आहे की, वार्ड क्रमांक ६ मधील रामोशी वस्ती, यादव वस्तीपासून ते नागोबा कट्टा व गावा लगतचा ओढा जोडणारी सांडपाणी वाहून जाण्यासाठी अंतर्गत गटार आहे. ही गटार आमदार फंडातून मंजूर करण्यात आली असून आचारसंहिता असल्यामुळे वर्क ऑर्डर आली नाही. आचारसंहिता संपताच वर्क ऑर्डर तयार होईल. परवाना मिळेल पण, सध्या पाणी साठवून राहून गटार तुंबून पाण्याची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे डासांचा फैलाव होत आहे. या डासांमुळे चिकनगुनिया, डेंग्यू, हिवताप, मलेरिया असे आजार लोकांना होत आहेत. तसेच गटारीचे काम करताना कामाला गणेश रामचंद्र यादव आणि दिनकर रामचंद्र यादव हे अडथळा आणत आहेत, काम होऊ देत नाही. ओढ्याची वहिवाट शंभर वर्षांपासून रस्त्यालगत आहे व रस्ता होत असताना शंभर वर्षांचा दगडी पुल पण आहे. तरीसुद्धा शासकीय कामाला अडथळा करत आहे.
तरी ७ तारखेपर्यंत या अर्जाची दखल न घेतल्यास वार्ड क्रमांक ६ मधील सर्व नागरिकांनच्या वतीने घाणपाणी घेऊन नगरपंचायत येथे मोर्चा काढण्यात येईल व सर्वजण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे. तोपर्यंत उड्डाणपूल नागोबा चौकातील साईड गटारसाठी काम थांबविण्यात यावे किंवा त्याकरिता खुली जागा राखावी. अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा जाणीवपूर्वक याला खतपाणी घालत आहेत, त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हे निवेदन दिले आहे.
अशा आशयाच्या निवेदनावर वॉर्डातील नागरिकांच्या सह्या देखील आहेत. हे निवेदन नगराध्यक्षा सौ. लक्ष्मी अशोक चव्हाण यांनी स्वीकारले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.