आदिनाथ साखर कारखान्यातील चोरीचा तपास करा, प्रशासक महेश चिवटे व संजय गुटाळ यांची निवेदनाद्वारे पोलिसांकडे मागणी
करमाळा (बारामती झटका)
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमधून दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी कारखान्याच्या स्टोअरमधून लाखो रुपयाचे सामान चोरीला गेले होते. याचा करमाळा पोलीस ठाण्यात नोंदवून गुन्हा दाखल झालेला आहे. तरीही अद्याप या प्रकरणाचा तपास झालेला नाही व आरोपींना अटकही झाली नाही. या प्रकरणाचा तपास व्हावा म्हणून पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात असे म्हटले आहे की, प्रत्यक्षात या कारखान्याच्या स्टोअर मधून 30 ते 35 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची शंका आहे. या चोरीत कारखान्यातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. तरी या प्रकरणात चोरी झालेल्या मागील व पुढील दहा दिवसांच्या काळात असलेल्या सर्व वॉचमनचे जबाब घेण्यात यावेत. तसेच या प्रकरणात तत्कालीन संचालकांचेही म्हणणे लेखी किंवा तोंडी स्वरूपात पोलिसांनी नोंदवून घ्यावे.
अशाच प्रकारे गेली तीन ते चार वर्षात आदिनाथ कारखान्यावरून अनेक वस्तू, भंगारचे सामान चोरीला गेले आहेत. या चोरीचा तपास लागला तर अनेक चोऱ्या उघडकीस येणार आहेत, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदनाच्या प्रती गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष देशपांडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आल्या आहेत.
या चोरीच्या प्रकरणात आदिनाथ कारखान्याचा एखादा कर्मचारी माफीचा साक्षीदार झाला व त्यांनी खऱ्या गुन्हेगारांची नावे पोलिसांना सांगितली तर अशा कर्मचाऱ्यांचा प्रशासक मंडळाच्यावतीने जाहीर सत्कार करून त्याला अकरा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल व त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी घोषणा प्रशासकीय संचालक महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng