आरेवाडीच्या बिरोबा बनात दसरा मेळाव्यानिमित्त आ. गोपीचंद पडळकरांची तोफ कडाडणार – नागेशमालक वाघमोडे
घोंगडी बैठकीच्या माध्यमातून उभा केलेली चळवळ आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात जाणवणार !
माळशिरस ( बारामती झटका)
आरेवाडी येथील बिरोबा बनात दि. २ ऑक्टोबर रोजी गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती नागेश वाघमोडे यांनी दिली. मेळाव्यात मेंढपाळांचा प्रश्न, धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न ,ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न, यावर चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना वाघमोडे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांमध्ये दसरा मेळावा घेता आला नाही. समाजाचा मेळावा होणं गरजेचं आहे. या निमित्ताने राज्यातील समाज एकत्रित येतो. एकत्रित आल्यानंतर विचार मंथन होते. आणि त्यातून जागृती होऊन संघर्ष करण्याची समाजामध्ये मानसिकता निर्माण होते. यातूनच समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. या मेळाव्यासाठी राज्यातून अनेक समाजबांधव हजेरी लावणार आहेत.
धनगर आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. धनगर समाजाला सरकारकडून अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळेल, असा विश्वास आ. गोपीचंद पडळकर यांना आहे. आणि समाजाचा विश्वास पडळकर यांच्यावरती आहे.
नागेश वाघमोडे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी मेंढपाळांवर हल्ले होत आहेत. मेंढपाळांच्या प्रश्नांसह चराऊ, कुराण, गायरान जमिनी, शेळी मेंढी विमा अशा अनेक प्रश्नांवर मेळाव्यात चर्चा होणार आहे. शेळी मेंढीचा विमा राज्य सरकारकडून उतरलेला जाणार असून त्यावर १०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याबाबतची तरतूद शासनाकडून करण्यात येणार आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात ७२ वसतीगृह काढण्यात येणार आहेत. ३६ वसतीगृह मुलांसाठी व ३६ वसतीगृह मुलींसाठी काढण्यात येणार असून त्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. अशा अनेक प्रश्नांवर बिरोबा बनात आ. गोपीचंद पडळकर यांची तोफ धडाडणार आहे.
प्रत्येक गावातून या दसरा मेळाव्यासाठी युवक निघणार आहेत तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आरेवाडीला जाण्यासाठी योग्य असे नियोजन करण्यात आले आहे, असे मत नागेश वाघमोडे यांनी शेवटी व्यक्त केले.
बैलगाडा शर्यतीच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनातून बैलगाडा शर्यत मालकांना मिळालेला न्याय, त्याचबरोबर एसटी कामगारांसाठी छेडलेले आंदोलन काही प्रमाणात यशस्वी झाले. येत्या काळामध्ये विलनीकरणाचा प्रश्नही सरकार आल्यामुळे मार्गी लागू शकतो. तर काही काळापूर्वी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून गावागावातील जागृत केलेल्या अठरापगड जातीमधील तरुण येत्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी उत्सुक झाला आहे. सोलापूर जिल्ह्यामधून हजारोंच्या संख्येने आरेवाडीला बहुजन समाज दाखल होणार आहे.
कुराण व गायरान जमिनीचा प्रश्न
राज्यात जनावरांना चरण्यासाठी जमिनी कुराण शिल्लक नाहीत. गायरान जमिनीचा प्रश्न गंभीर बनला आहे. चारा नसल्याने जनावरे कुठे जाणार ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने गायरान जमिनीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून याबाबत धोरण ठरवले पाहिजे, यावर देखील चर्चा होणार आहे. या माध्यमातून मेंढपाळ आणि पशुपालकांचा बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागू शकतो.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng