‘जरंडेश्वर’ च्या माजी उपाध्यक्षांसह तिघांना शिक्षा
कोरेगाव (बारामती झटका)
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याने दिलेला २५ लाख रुपयांचा धनादेश न वटता परत आला. याप्रकरणी कोरेगाव न्यायालयात जवाहर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने दाखल केलेल्या खटल्यामध्ये शनिवारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यू. ए. भोसले यांनी तीन जणांना २ वर्षे शिक्षा, २५ लाख रुपयांचा दंड व दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली.
या खटलातून कारखान्याच्या संस्थापिका माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांना बाजूला ठेवण्यात आले असून त्यांच्यावरील खटला पुढे चालवण्यात येत आहे. कारखान्याचे तत्कालीन उपाध्यक्ष शंकरराव भोसले पाटील, तत्कालीन कार्यकारी संचालक उदयसिंह घाटगे व मुख्य लेखापाल संभाजी येवले यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कोरेगाव येथील जवाहर पतसंस्थेने जरंडेश्वर साखर कारखान्याकडे ७० लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली होती. ठेवीच्या रकमेपोटी कारखान्याने प्रत्येकी २५ लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते. दोन्ही धनादेश न वटता परत आले. दरम्यानच्या काळात कारखान्याने एका धनादेशाच्या रकमेपोटी २५ लाख रुपये पतसंस्थेकडे जमा केले. त्यामुळे एक धनादेश न वटता परत आला, म्हणून पतसंस्थेने २०१० मध्ये कोरेगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात धनादेशाचा अवमान केला म्हणून खटला दाखल केला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng